‘राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे धान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यायलाच हवी’.. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत एक मंत्री मोठय़ा आवेशाने शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडत होते. त्यांचा हा आवेश पाहून बैठकीतील त्यांचे सहकारी अवाक् झाले होते. अधिकारीही कुतूहलाने हा सगळा प्रकार पाहत होते. शेवटी न राहवून, एका ज्येष्ठ मंत्र्याने तोंड उघडले. ‘भाऊ, आजवर आपण विरोधात बसून बोलत होतो, आता सत्तेत आलो ना’.. अशा मोजक्याच शब्दात त्याने भाऊंना भानावर आणले. आणि सगळा प्रकार लक्षात आल्यावर, ‘काय करणार, १५ वर्षांची सवय आहे ना’.. असे म्हणत, शरमलेल्या भाऊंनीही वेळ मारून नेली.
राज्यात सत्तांतर होऊन सत्तेच्या खुर्चीवर भाजप विराजमान होऊन आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. काँग्रेसचा सत्तेचा रुबाब उतरला असला तरी विरोधकांच्या भूमिकेतून भाजप मात्र अजूनही बाहेर पडलेला नाही. राज्य विधानमंडळाच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनादरम्यान सत्ताधारी भाजपचा विरोधकांच्याच छायेतील आवेश पाहावयास मिळाला होता. सदस्य वा मंत्रीच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विरोधकांच्या भूमिकेतून वावरताना अनेकांनी पाहिले. हे कमी म्हणून की काय, विदर्भातील एका ज्येष्ठ मंत्र्याने नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी अर्धा डझन अशासकीय ठरावांचे प्रस्ताव विधानमंडळ सचिवालयाकडे दाखल केले होते. सत्ताधारी पक्षाला, त्यातही मंत्र्याला असे ठराव देता येत नसल्याची बाब विधानमंडळ   सचिवालयाने भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याच्या कानावर घातली आणि अनर्थ टळल्याचे समजते.
गेली १५ वर्षे विरोधात बसलेल्या भाजपच्या नसानसात भिनलेल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचे प्रत्यंतर मंगळवारी पुन्हा आले. दुष्काळाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असताना राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या एका मंत्र्याने नेहमीच्या शैलीत शेतकऱ्यांची समस्या प्रभावीपणे मांडली आणि त्यांना जास्तीतजास्त मदत देण्याचा आग्रह धरला. आजवर आर्थिक बाबींचे प्रस्ताव आले की त्यात खोडा घालण्याचीच भूमिका वठविणाऱ्या याच विभागाच्या या मंत्र्यांनी उचललेली शेतकऱ्यांची तळी पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. शेजारी बसलेल्या मंत्र्याने त्यांना मंत्रिपदाची जाणीव करून दिली. तेव्हा ते भानावर आले. याच सरकारमधील एका मंत्र्याने तर आपल्या जुन्या सवयीप्रमाणे थेट मुख्यमंत्र्यानाच स्मरणपत्र देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपण सरकारमध्ये आहोत, जुन्या सवयी आता थांबवा, असे मुख्यमंत्र्यांनी फटकारल्याचे कळते.