सहा महिन्यांत लोकल, एक्स्प्रेसच्या २,६०० फेऱ्यांना विलंब; २०० घटनांत विनाकारण साखळी खेचल्याचे उघड

आपत्कालीन काळात प्रवाशांना गाडी थांबवता यावी याकरिता रेल्वे गाडय़ांच्या डब्यांमध्ये बसवण्यात आलेली साखळी आता मध्य रेल्वेच्या ‘लेटलतीफ’ सेवेत आणखी विलंब करत आहे. गेल्या सहा महिन्यांत ही साखळी खेचल्यामुळे लोकल व एक्प्रेसच्या २,६०० फेऱ्यांना विलंब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी २०० प्रकरणांत तर प्रवाशांनी विनाकारण साखळी खेचल्याचेही उघड होत आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात (सीएसएमटी ते कसारा, खोपोली, इगतपुरी, लोणावळा) प्रवाशांकडून एक्स्प्रेस व लोकल गाडीतील आपत्कालीन साखळी खेचल्याच्या ६२२ प्रकरणांची नोंद झाली. त्यामुळे २,६०० पेक्षा जास्त लोकल, एक्स्प्रेस फेऱ्या उशिराने धावल्या. थोडक्यात, या साखळ्या मध्य रेल्वेकरिता डोकेदुखीच्या ठरल्या आहेत.

लोकल किंवा एक्स्प्रेस पकडताना एखादा मित्र किंवा नातेवाईकाला काही कारणास्तव डब्यात प्रवेश न मिळणे, फलाटावरच सामान विसरणे, चुकीची गाडी पकडल्याने पुन्हा दुसऱ्या स्थानकात उतरण्यासाठी प्रयत्न करणे अशा काही कारणांमुळे प्रवाशांकडून आपत्कालीन साखळी खेचली गेली आहे. याबरोबरच काही किरकोळ व कारण नसतानाही साखळी खेचण्याचे प्रकार घडतात. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात साखळी खेचण्याच्या ६२२ प्रकरणांची नोंद झाली असून त्यामुळे १,१०५ मेल-एक्स्प्रेस फेऱ्या व १,५७० लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. गेल्या जून महिन्यात याच कारणांमुळे ३५३ लोकल फेऱ्या विस्कळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या फेऱ्या उशिराने धावल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला. साखळी खेचण्यामागील कारणांचा तपास केला असता २०० जणांनी विनाकारण साखळी खेचल्याचे निदर्शनास आले. साखळी खेचल्यानंतर ३०० प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. या प्रवाशांना दंड व शिक्षा भोगावी लागली.

कल्याणमध्ये प्रमाण जास्त

कल्याण स्थानकात लोकल व एक्स्प्रेस गाडीच्या डब्यातील साखळी खेचण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. ठाणे स्थानकात दहा टक्के आणि त्यानंतर सीएसएमटी, दादर, कर्जतसह अन्य स्थानकांचा नंबर लागतो.