सगळ्या सूचना तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित दिल्या आहेत. कुणीही काळजी करु नये, घाबरुन जाऊ नये. गोंधळ निर्माण करु नये. देश लॉकडाउन असला तरीही जीवनावश्यक सेवा सुरुच राहतील असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निवेदन दिलं ते अत्यंत गांभीर्याने दिलं आहे. ते ऐकल्यानंतर मी क्षणभर चरकलोच. लॉकडाऊन ही गोष्ट काळजाचा ठोका चुकवणारी आहे. माझ्याही मनात भीती आणि शंका निर्माण झाली की आता करायचं काय ? त्यानंतर मी पंतप्रधानांशी बोललो. त्यांना कल्पना दिली की जवळपास महाराष्ट्र आम्ही लॉकडाउन केलाच आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्याच लागतील. त्यासाठी लागणारे कर्मचारीही आपल्याला ठेवावे लागतील अन्यथा गोंधळ निर्माण होईल. याची कल्पना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा घाबरुन न जाण्याचं आणि घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं.करोनाचे संकट हे अत्यंत गंभीर आहे. कृपया घराबाहेर पडू नये महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबतच आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात करोनाचे आत्तापर्यंत १०७ रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे. करोनाचं संकट आपल्या उंबरठ्यावर उभं आहे. आपण घराबाहेर पडलो तर ते संकट आपल्या घरात येईल. त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.