सामाजिक संस्थांच्या मदतीकडे कंपन्यांची पाठ; सराव बंद, आहाराचाही प्रश्न

अमर सदाशिव शैला
मुंबई : आर्थिक समस्यांना तोंड देत चिकाटीने क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या खेळाडूंना करोनामुळे बिघडलेल्या अर्थचक्राचा फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांकडील मदतनिधी आटल्याने मागील काही महिन्यांपासून मुलांचे प्रशिक्षण थांबले आहे. या उदयोन्मुख खेळाडूंच्या पोषण आहाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

शासकीय सुविधांचा अभाव आणि खासगी क्रीडा संकुलांमध्ये प्रशिक्षण घेण्याची आर्थिक अक्षमता यांमुळे मुळातच कौशल्य असूनही अनेकांचे खेळाडू होण्याचे स्वप्न सत्यात उतरत नाही. अडचणींना तोंड देत मेहनत करणाऱ्या खेळाडूंना मिळणारा सामाजिक संस्थांचा आधारही आता कमकुवत झाला आहे. संस्थांना मोठय़ा कंपन्यांकडून मिळणारा निधी करोनाकाळात बंद झाला आहे. संस्थांनाच निधीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे विद्यार्थी खेळाडूंचे प्रशिक्षण, पोषण यावरही परिणाम झाला आहे.

मूळची सातारा जिल्ह्य़ातील असलेली आणि सध्या वडाळा परिसरात वडिलांसोबत राहणारी १६ वर्षीय स्नेहा (नाव बदलून) ही बॅडमिंटन खेळातून स्वप्ने साकारू इच्छित आहे. स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या मदतीने स्नेहा मागील तीन वर्षांपासून बॅडमिंटनचा सराव करत आहे. नुकत्याच झालेल्या १० वीच्या परीक्षेत तिला ८३ टक्के गुण मिळाले आहेत. टाळेबंदीपूर्वी तिचे वडील डबे पोहोचविण्याचे काम करत. मात्र करोना काळात त्यांची नोकरी गेल्यामुळे ते एका ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कामाला जातात. या पगारातून मुलगा आणि दोन मुलींच्या कुटुंबाचा खर्च त्यांना भागवावा लागतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने स्नेहाही भाज्या चिरण्याच्या कामाला जाते. पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंतच्या कामातून तिला २०० रुपये मजुरी मिळते. त्यातून पुढील शिक्षणासाठी काही रक्कम वाचवून उर्वरित घर खर्चासाठी देते. संस्था तिच्या आहाराचा खर्च उचलत असल्याने खेळासाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता निर्माण झाली होती. मात्र सध्या हा आहार मिळतच नसल्याने आणि कुटुंबाचा खर्च कसाबसा चालत असल्याने तिच्या शारीरिक क्षमतांवरही परिणाम होत असल्याचे स्नेहाने सांगितले.

हीच परिस्थिती वडाळा ट्रक टर्मिनस भागात राहणाऱ्या समीरची (नाव बदलून) आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याचा खेळाचा सराव बंद झाला आहे. बॅडमिंटन कोर्टमध्ये सराव करावा, तर सरावासाठीचे भाडे भरायला पैसे नसल्याने खेळ थांबला आहे. सध्या तो दररोज सकाळी ४ तास आणि सायंकाळी ४ तास फळांची गाडी लावतो. त्याच्या वडिलांची नोकरी गेल्यामुळे त्याच्या उत्पन्नाचा कुटुंबाला हातभार लागतो. समीरही नुकताच दहावीत उत्तीर्ण झाला आहे. त्याला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. सध्या त्याचे १८ वर्षांखालील मुलांच्या गटात खेळण्याचे स्वप्न आहे. मात्र सरावाअभावी आणि संस्थेच्या मदतीअभावी हे कधी शक्य होणार याची कोणतीच शाश्वती नसल्याचे तो सांगतो.  ही दोन्ही मुले ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा (जिल्हास्तरीय स्पर्धा) खेळली आहेत. आता सीनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयारी करत होते. सरकारने या मुलांसाठी कमीतकमी कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती द्यायला हवी. त्याचबरोबर या मुलांना सराव करता यावा याकरिता त्यांच्या घरापासून नजीकच्या अंतरावर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी क्रॉय संस्थेच्या विकास साहाय्य विभागाचे व्यवस्थापक कुमार निलेंदू यांनी केली आहे.

सामाजिक संस्थांचा निधी आटला

बॅडमिंटन कोर्टमध्येच खेळाचा सराव करणे फायदेशीर असते. त्यासाठी दर महिन्याचे साधारणपणे २ ते ३ हजार रुपये भाडे द्यावे लागते. योग्य प्रमाणात पोषणमूल्य असलेला आहार आवश्यक असतो. तसेच प्रशिक्षकाची फी आणि साहित्याचा खर्चही येतो. ही मुले वडाळा परिसरातील झोपडपट्टी भागात राहत असल्याने तेथून ते बॅडमिंटन कोर्टपर्यंतचा प्रवास खर्चही येतो. या सर्वावर मिळून संस्थेचा साधारणपणे प्रत्येक मुलामागे दरमहा १० ते १२ हजार रुपये खर्च येतो. संस्थेत बॅडमिंटन स्पर्धेसाठी २४ मुलांची तयारी सुरू आहे. बॅडमिंटन खेळणाऱ्या या मुलांसाठी ९ लाख रुपयांचा निधी एका कंपनीमार्फत मिळत होता. तो सध्या बंद झाला आहे. त्यांच्या पोषण आहारासाठी होणारा खर्च थांबवावा लागला आहे. त्याचा मुलांच्या शारीरिक क्षमतांवर परिणाम होऊन खेळासाठी आवश्यक ऊर्जा, शक्ती (स्टॅमिना) कमी होत आहे, असे स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देसाई यांनी सांगितले.