लोकांचे आरोग्य आणि त्यांची श्रद्धा यात आरोग्याला प्राधान्य देत धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल समाजातील प्रतिष्ठितांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

करोना संसर्गाचा धोका कायम असताना राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी दबाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची जाणीव करून दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठितांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रार्थनास्थळे तूर्त बंद ठेवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शांता गोखले, दिलीप प्रभावळकर, जयंत पवार, नीरजा, डॉ. हेमचंद्र प्रधान, विश्वास उटगी, मिलिंद मुरूगकर, मंजिरी मणेरीकर, भारती शर्मा, मुक्ता दाभोलकर, अनिष पटवर्धन, लोकेश शेवडे, सुनील वालावलकर, भूषण ठाकू र यांच्यासह दोन हजार मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणाऱ्यांत समावेश आहे.

जेव्हा प्रश्न श्रद्धेचा असतो, तेव्हा ठाम राजकीय भूमिका घेणे कठीण असते. अशावेळी जनतेचे आरोग्यहित लक्षात घेत धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.