शैलजा तिवले

करोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआरच्या चाचण्यांच्या मर्यादित सुविधा आणि अहवालासाठी लागणारा वेळ यामुळे राज्यात प्रतिजन (अँटिजेन) चाचण्यांवरील भर वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत एकूण चाचण्यांच्या तुलनेत प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण ११ वरून ३४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

प्रतिजन चाचण्यांच्या माध्यमातून करोनाचे निदान अर्ध्या तासात करता येते. तसेच ही चाचणी करणे तुलनेने सोपी असल्याने प्रयोगशाळेबाहेरही करता येते. आरटीपीसीआर चाचण्या प्रयोगशाळेत कराव्या लागत असून याचे अहवाल येण्यास २४ तासांचा कालावधी लागतो. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांच्या तुलनेत ही चाचणी कमी खर्चीक आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या चाचण्या करण्याकडे कल वाढत आहे.

राज्यात ३१ जुलैपर्यंत २,४७,१०८ प्रतिजन चाचण्या झाल्या होत्या, तर आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या १८,८२,९९० होती. तर २१ सप्टेंबपर्यंत प्रतिजन चाचण्यांची संख्या २०,३३,५६६ गेली असून एकूण चाचण्यांची संख्या ५९,१२,२५८ होती.

आरटीपीसीआर चाचण्यांची किंमत सुरुवातीला साडेचार ते पाच हजार होती. परंतु उत्तरोत्तर कमी होत आता १५० ते २०० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वीइतका प्रतिजन चाचण्यांच्या तुलनेत खर्चाचा मुद्दा नाही. परंतु करोना संसर्गाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढला असून तेथे आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी किंवा वैद्यकीय महाविद्यालयातच प्रयोगशाळा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात प्रतिजन चाचण्या करणे सोईस्कर असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रयोगशाळांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ऑगस्टमध्ये राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचण्यांच्या वापरावर मर्यादा आणल्या. नव्या नियमावलीनुसार, आता रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या आणि परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या प्राधान्याने आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातील. अन्य सर्व संशयितांच्या आधी प्रतिजन चाचण्या केल्या जातात.

सर्वाधिक प्रतिजन चाचण्या पुण्यात (२,७१,९१४) झाल्या आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद (२,५८,२०४), ठाणे (२,४३,०७३), मुंबई (१,४०,१०६) आणि नागपूर (१,३९,५४४) येथे झाल्या आहेत.

आरटीपीसीआर चाचणी अचूकतेच्या बाबतीत सध्या सर्वाधिक मान्यता असलेली चाचणी आहे. निदान त्वरित करणे आवश्यक आहे अशा आपत्कालीन स्थितीमध्ये प्रतिजन चाचणीचा वापर करणे योग्य राहील.

कारण याची अचूकता आरटीपीसीआरच्या तुलनेत कमी आहे. सरसकट चाचण्यांसाठी याचा वापर केला जात असेल तर यातून बाधित न आढळलेल्या परंतु लक्षणे असलेल्या रुग्णांचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे, अन्यथा रुग्णांचे निदान न झाल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक आहे, असे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवाणूशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. रोहिणी केळकर यांनी सांगितले.

आरटीपीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक

प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण आरटीपीसीआरच्या तुलनेने अधिक आहे. या चाचण्यांची अचूकता तुलनेने कमी असल्याने योग्य निदान होऊन रुग्णांना वेळेत उपचार करण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

केवळ एक टक्के व्यक्तींच्या पुन्हा आरटीपीसीआर

प्रतिजन चाचण्यांच्या अचूकतेबाबत साशंकता असल्याने चाचण्यांमध्ये बाधित न आढळलेल्या परंतु लक्षणे असलेल्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे नियमावलीत सूचित केले आहे. राज्यात एकूण चाचण्यांमध्ये प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण ३४ टक्के असूनही यातील बाधित न आढळलेल्यांपैकी केवळ एक टक्का व्यक्तींच्या पुन्हा आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत.