राज्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूचे सरासरी प्रमाण हे सध्या ६० टक्के असले तरी हे प्रमाण कमी करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. यासाठीच अत्याधुनिक व डॉक्टरांसह सज्ज अशा रुग्णवाहिकांचे जाळे विणण्यात येणार असून, साधारणपणे २० मिनिटांमध्ये रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.
रुग्णावाहिकांमध्ये तैनात करण्यात येणारे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेतील मेरिलँण्ड विद्यापीठाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राज्य शासन आणि विद्यापीठात करार करण्यात आला. राज्यात ९३७ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असून त्याचा खर्च हा केंद्र सरकारकडून मिळणार आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ७५ हजार अपघात होतात व त्यात १२ हजारांच्या आसपास मृत्यूमुखी पडतात. वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळेच अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असलेल्या या रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. अत्यवस्थ रुग्णाला तात्काळ उपचार मिळावेत आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे हा उद्देश असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. करारावर मेरिलँणड विद्यापीठाच्या वतीने डॉ. थॉमस  स्केला तर राज्य शासनाच्या वतीने अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) टी. सी. बेंजामिन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. दरवर्षी दोन डॉक्टर्सना विद्यापीठाच्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या रुग्णवाहिकांसाठी १०८ हा दूरध्वनी क्रमांक फिरवावा लागेल. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता पुण्यात कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात टप्प्याटप्प्याने सर्व रुग्णवाहिका सेवेत तैनात केल्या जातील, असे शेट्टी यांनी सांगितले. राज्य शासनाने या सेवेसाठी ६३२ रुग्णालये निश्चिचत केली आहेत. यातील ५०० शासकीय तर १३२ खासगी रुग्णालये आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर या रुग्णालयांमध्ये तात्काळ उपचार होतील.