08 August 2020

News Flash

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार मंदी

यांत्रिकीकरण आणि परदेशांतील धोरणे कारणीभूत ठरणार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सध्या यांत्रिकीकरण, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांचे स्वदेशी धोरण आणि कमी होत असलेले नफ्याचे प्रमाण या दुष्टचक्रात अडकले आहे.

यांत्रिकीकरण आणि परदेशांतील धोरणे कारणीभूत ठरणार

स्वत:मध्ये काळानुरूप आवश्यक ते बदल न करता काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यातही रोजगार मंदी कायम राहणार आहे. कारण तंत्रज्ञानाच्या बळावर एक हजार माणसांचे काम १०० माणसांमध्ये होऊ लागले आहे. याचा परिणाम भविष्यात रोजगार निर्मितीवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धा, परदेशांतील धोरणे आणि आर्थिक मंदी या पाठोपाठ लवकरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर रोजगार मंदीचे वादळ घोंघावणार आहे.

सध्या बाजारात सुरू असेलली नोकरकपात ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत पाहिली तर ती टक्क्यांमध्ये खूप कमी आहे. काळानुरूप बदलण्याचा सिद्धांत माणसाने अवलंबला नाही तर त्यांना या क्षेत्रातून बाहेर पडावेच लागेल असा दावाही कंपन्या करत आहेत. आज देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १५० अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल आहे. या क्षेत्राचा हा विकास तब्बल ४० लाख कर्मचाऱ्यांच्या जोरावर झाला आहे. यामध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. मात्र आता कंपन्या उत्पादन क्षेत्राकडे जास्त लक्ष देऊ लागल्या आहेत. यासाठी सेवा क्षेत्रातील कौशल्यांपेक्षा काही वेगळी कौशल्ये असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौशल्य विकसित केले तर त्यांनाही ही संधी मिळू शकते. मात्र आज जे काम दहा जण करायचे ते करण्यासाठी एकाच माणसाची आवश्यक भासत आहे. यामुळे २०२५मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची उलाढाल दुप्पट होईल असा आमचा मानस आहे. मात्र पुढचा टप्पा गाठण्यासाठी आम्हाला पुन्हा ४० लाख कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही असे मत ‘मॅसटेक’ कंपनीचे संस्थापक व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची संस्था ‘नॅसकॉम’च्या संस्थापकांपैकी एक अशांक देसाई यांनी व्यक्त केले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सध्या यांत्रिकीकरण, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांचे स्वदेशी धोरण आणि कमी होत असलेले नफ्याचे प्रमाण या दुष्टचक्रात अडकले आहे. यामुळे त्यांच्याकडे कमी कौशल्य असलेल्या लोकांना कमी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र ही परिस्थिती तात्पुरती असल्याचे मत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व सल्लागार दीपक शिकारपूर यांनी मांडले. ही परिस्थिती सात ते आठ वर्षांनी येत असते. काही काळ लोटला की पुन्हा रोजगारसंधी उपलब्ध होऊ शकतील. मात्र आता उच्च कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले. याचबरोबर देशात अनेक संधी उपलब्ध असून लोक दक्षिण अमेरिका, जपान अशा इतर देशांमध्येही नोकरीच्या संधी शोधू शकतील. याशिवाय अनेक तरुण नवउद्योगाचा मार्गही अवलंबू शकतील असेही त्यांनी नमूद केले.

केवळ कोडिंग नको

केवळ कोडिंग करण्यासाठी माणसे कामाला ठेवणे अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या पसंत करत नाहीत. कारण आता या क्षेत्राच्या कक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तव अशा विविध पैलूंपर्यंत विस्तारल्या आहेत.

या गोष्टी विकसित करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. यामुळे या क्षेत्रात सध्या ‘प्रोग्रामर’ ऐवजी ‘सॉफ्टवेअर विकासक’, ‘व्यवसाय चिकित्सक’,‘माहिती प्रशासक’, ‘माहिती सुरक्षा तज्ज्ञ’, ‘संकेतस्थळ विकासक’, ‘तंत्रज्ञान संशोधक’ अशा तज्ज्ञांची गरज भासू लागली आहे. यामुळे सध्या कोडिंग करणाऱ्या अनेकांना विविध अभ्यासक्रम पूर्ण करून कंपनीला आवश्यक ती कौशल्ये आत्सात करून घेण्यास सुरुवात केली आहे.

सद्यस्थितीत देशभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीड लाख रोजगार संधी उपलब्ध होतात. हे प्रमाण कमी होईल असे नाही परंतु विद्यमान कर्मचाऱ्यांकडे असलेल्या कौशल्यांपेक्षा वेगळी कौशल्ये असलेल्या माणसांची गरज अधिक जाणवेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा भाग असलेल्या ‘बीपीओ’मध्ये यांत्रिकीकरणाचा फटका मोठय़ा प्रमाणावर बसू शकेल.  – अशांक देसाई, संस्थापक, मॅसटेक.  

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2017 2:27 am

Web Title: employee reduction in it sector part 3
Next Stories
1 शेतकऱ्यांना वाढीव वीजदरानुसार बिले
2 बारावीनंतरचे करिअर मार्ग उलगडणार!
3 रस्त्यांची ६० टक्के कामे पावसाळ्यानंतर
Just Now!
X