परराज्यात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांसाठी स्थानकांबाहेर स्थलांतरितांचे लोंढे

सुहास जोशी, अमर सदाशिव शैला, निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : कार्यालये, कंपन्या लवकर सुरू होण्याची शाश्वती नाही, व्यापार पूर्वीसारखा चालण्याची हमी नाही आणि त्यात दिवसेंदिवस वाढत चाललेला करोनाचा विळखा यांमुळे मुंबईतील नोकरदार, व्यावसायिक, कुशल कामगार असलेला वर्गही देशाच्या आर्थिक राजधानीपासून दूर पळू पहात आहे. स्थलांतरितांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाडय़ांमध्ये जागा मिळवण्यासाठी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांबाहेर उसळलेल्या हजारोंच्या गर्दीत अशी अनेक कुटुंबे भल्यामोठय़ा बॅगा सावरत दिसत होती.

रोजगार ठप्प झाल्याने आपापल्या गावी परतू लागलेल्या श्रमिकांसाठी विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात येत आहेत. या रेल्वेगाडय़ांच्या उपलब्धतेवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या वादानंतर मंगळवारी अचानक मोठय़ा प्रमाणात रेल्वेगाडय़ा सोडण्याची तयारी झाली. मात्र, या राजकीय साठमारीत पोलीस, बेस्ट, एसटी आणि रेल्वे अशा सर्वच यंत्रणांवर मोठा ताण पडला. दिवसभर शहरातील अनेक पोलीस ठाण्यांच्या बाहेर एसटी, बस आणि स्थलांतरीतांच्या लांबलचक रांगा दिसत होत्या.

दिवसभर मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यात नोंद केलेले स्थलांतरीत या स्थानकांबाहेर येत होते. दर पाच-दहा मिनिटाला एक या वेगाने बेस्ट किंवा एसटीच्या बसगाडय़ातून प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे सीएसएमटीच्या वाडी बंदर प्रवेशद्वाराकडील रस्त्यावर उतरत होते. प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर दोन्ही बाजूस किमान अर्धा किमीची लांबलचक अशी दुहेरी रांग लागली. मंगळवारी उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांबरोबर पश्चिम बंगाल, ओदिशा आणि तामीळनाडू या इतर राज्यात देखील गाडय़ा जाणार असल्याने भारताचे एक छोटेसे रुपच या ठिकाणी दिसत होते. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील प्रशस्त असे वाहनतळ पूर्णपणे स्थलांतरितांनी भरून गेले होते.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरितांना गावी परत जाण्यासाठी पोलीस ठाण्यात नाव नोंदण्याची प्रक्रिया सुरू झाली . मात्र यामध्ये नंबर केव्हा लागणार याची कसलीच खात्री नसल्याने अनेकांनी मिळेल त्या मार्गाने शहर सोडायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांची संख्या अधिक होती. मात्र मंगळवारच्या स्थलांतरीतांच्या गर्दीत मध्यमवर्गीय, नोकरदार, कुशल कामगार अशांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सहकुटुंब मोठाल्या बॅगा घेऊन जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. तर काहीजणांचे स्वत:च्या मालकीचे घर असूनदेखील सध्या गावी जात होते. गर्दीतील अनेकांशी संवाद साधल्यावर त्यांनी गावी जाण्यासाठी केवळ १० दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात अर्ज केले होते असे सांगितले.

कोणती गाडी सुटणार हे नक्की माहीत नसल्याने पोलिसांची देखील धावपळ उडाली. पोलिसांना अनेकदा दुचाकी अथवा चार चाकी वाहनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या गर्दीला सुटणाऱ्या गाडीचे नाव घेऊन पुढे येण्यासाठी स्थलांतरीतांना बोलवावे लागत असे. अनेकदा रेटारेटीचे प्रसंगही उद्भवले. एसटी अथवा बसमधून उतरलेल्या स्थलांतरीतांना नेमक्या कु ठल्या रांगेत जायचे हे न कळल्याने गोंधळून गेले होते. स्थलांतरीतांना आणण्यासाठी टेम्पो, ट्रकचा वापरदेखील केला जात असल्याचे दिसून आले.

कुशल कामगारही मूळ गावी

धारावी येथून परत जाणाऱ्यांची संख्या मंगळवारच्या गर्दीत मोठी होती. त्यामध्ये चामडय़ाच्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांचे अनेक समूह दिसत होते. पश्चिम बंगाल येथे जाणाऱ्यांमध्ये जरी काम, कापडाच्या व्यवसायाशी निगडित तसेच दागिने व्यवसायातील अनेकांचा सहभाग होता. त्याचबरोबर शिलाई काम करणारे छोटे व्यावसायिकदेखील होते.  परत जाणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या देखील मोठी होती.