महानगर टेलिफोन निगमच्या मुंबई आणि दिल्ली येथील ३३ हजार कर्मचाऱ्यांना ५ डिसेंबरला थकीत वेतन दिले जाणार आहे. या संदर्भात महानगर टेलिफोन निगमने एक पत्रक काढले आहे. या पत्रकात पगार ५ डिसेंबरला दिले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याचा पगार या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. हा पगार महिन्याच्या शेवटी २८ किंवा २९ तारखेला होत असतो पण तो झाला नसल्याने सगळेच कर्मचारी चिंतेत होते. मात्र आता त्यांचा हा पगार ५ डिसेंबरला दिला जाईल असे MTNL तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

एअर इंडियापाठोपाठ MTNL वरही आर्थिक दिवाळखोरीची वेळ आली आहे. निधीच्या कमतरतेमुळे एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला जाणार नाही अशी माहिती मुंबई आणि दिल्लीच्या कार्यकारी संचालकांनी पत्रकाद्वारे दिली होती. आता मात्र हा पगार ५ डिसेंबरला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

एमटीएनएलच्या लँडलाईनपेक्षा मोबाइल स्वस्त असल्यामुळे एमटीएनएलची ग्राहक संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रात जिओच्या प्रवेशामुळे मोठी स्पर्धा सुरु आहे. अनेक आघाडीच्या खासगी मोबाईल कंपन्यांही स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सुरु असलेल्या दर युद्धात दूरसंचार कंपन्यांच्या नफ्याचे गणित पार बिघडले आहे. त्यातही सरकारी कंपनी असलेल्या एमटीएनएलला जास्त झळ बसल्याचे सूचित होत आहे.