१५ कर्मचाऱ्यांचे पगार १० महिन्यांपासून प्रलंबित; जहाज मालकाने नोकरीतून मुक्त न केल्याने अडचणीत वाढ
मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या जहाजाच्या मालकाने १५ कर्मचाऱ्यांचा पगार थकविल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांचा पगार मागील १० महिन्यांपासून प्रलंबित आहे. तर जवळपास चार कर्मचाऱ्यांना जहाजाच्या मालकाने नोकरीतून मुक्त केले नसल्याने अद्याप ते मुंबई बंदरात अडकून पडले आहेत.
गोल्डन स्टार सपोर्ट सव्र्हिसेस कंपनीचे एम. व्ही. गोल्डन प्राईड हे मालवाहतूक जहाज बॉम्बे पोर्ट ट्रस्टने जप्त केले आहे. मागील तीन वर्षांपासून हे जहाज बंदरात उभे आहे. तरीही जहाज कामगिरीवर जाणार असल्याचे सांगून शिकाऊ कर्मचाऱ्यांना कामासाठी धाडले जात आहे. सुविधाही तुटपुंज्या असून दिवसातून फक्त दोन तास दिवे सुरू करता येईल एवढेच डिझेल उपलब्ध होते. रात्री जहाजाच्या डेकवर कर्मचाऱ्यांना झोपावे लागते. जहाजाच्या स्वयंपाकघरातही अस्वच्छता आहे. त्याच ठिकाणी वरणभात तयार करून दिवस ढकलत आहेत. कर्मचाऱ्यांनी याबाबत डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही मदत मिळाली नाही, अशी माहिती धीरज शिंगाडे या जहाजावरील अधिकाऱ्याने दिली. ‘मागील १० महिन्यांचा सुमारे ३ लाख रुपये पगार मालकाने दिला नाही. त्यामुळे कर्ज काढून घर चालवावे लागत आहे. जहाजावरून उतरलो तर पगाराची थकबाकी मिळणार नाही. त्यामुळे काम सोडून घरी जाऊ शकत नाही,’ अशी व्यथा धीरज याने मांडली.
तर अब्दुल कादीर हा स्वयंपाकी दलालाकडे ६० हजार रुपये भरून कामाला लागला होता. ‘जहाजावर ९ महिने काम केले. यातील ६ महिन्यांचा पगार मालकाने दिला नाही. परिणामी जहाज सोडून घर गाठले आहे,’ असे अब्दुल याने सांगितले. तर अर्जुन सुब्बया हा अभियंता दलालाला १.५ लाख रुपये देऊन जहाजावर कामाला लागला होता. ‘काम केलेल्या १४ महिन्यांपैकी ७ महिन्यांचा १ लाख ६५ हजार रुपये मालकाकडे थकीत आहे. नोकरी सोडून सहा महिने झाले तरी मालक आश्वासनांव्यतिरिक्त काहीच देत नाही,’ अशी माहिती अर्जुन याने दिली. याबाबत शिपिंग विभागाशी संपर्क साधला असता, ‘जहाजावरील खटला प्रलंबित असून ते सध्या एनसीएलटीच्या ताब्यात आहे. कर्मचाऱ्यांना समस्यांबाबत एनसीएलटीला पत्र लिहून सोडविण्याची मागणी करू,’ अशी माहिती डायरेक्टर जनरल शिपिंग अमिताभ कुमार यांनी दिली.
दलालांकडून तरुणांची फसवणूक
मालवाहतूक जहाजावर इंटर्नशिप अथवा ट्रेनिंगसाठी पाठविण्याच्या बहाण्याने दलालांनी या तरुणांकडून लाखो रुपये उकळून बंद जहाजावर कामाला पाठवून त्यांची फसवणूक केली. तरुणांना पगाराविना अनेक महिने अत्यंत बिकट स्थितीत जहाजावर दिवस काढावे लागत आहेत. मालकाकडे पगार प्रलंबित असल्याने आणि करारातून मुक्तता केल्याशिवाय जहाज सोडता येत नाहीत, अशा कात्रीत कर्मचारी अडकले आहेत. त्यामुळे यंत्रणांनी हस्तक्षेप करून या कर्मचाऱ्यांची सुटका करावी, अशी मागणी ऑल इंडिया सिफेर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:16 am