मुंबईत परतणाऱ्या कामगारांची मानसिकता: ‘गावात काम नाही, तिथे भुकेने मरावे लागले’

सुहास जोशी-अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत आणि करोनाची भीती अशा परिस्थितीत हे शहर सोडून गेलेले स्थलांतरित कामगार रोजगार मिळू लागल्यावर पुन्हा शहरात परतत आहे. यावेळी करोनाच्या भीतीपेक्षाही मिळणारा रोजगार महत्त्वाचा असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात रोजगाराची परवड वाढल्यावर हजारो स्थलांतरित कामगारांनी मिळेल त्या मार्गाने गाव गाठले. मात्र आता ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत काही बाबी पूर्वपदावर येऊ लागल्याने अनेक कंत्राटदारांनी या कामगारांना आपणहून बोलवायला सुरुवात केली आहे. परिणामी उत्तर भारतातून रोज मुंबईत येणाऱ्या गाडय़ांमध्ये बहुतांशपणे

या मजुरांचीच गर्दी अधिक दिसू लागली आहे.

यामध्ये विशेष कला अवगत असणाऱ्यांपासून ते बिगारी कामापर्यंत सर्वाचाच समावेश असल्याचे दिसते. या मजुरांशी संवाद साधला असता, त्यांची रोजगाराचीच अपेक्षा अधिक ठळकपणे जाणवते. ‘करोनाची भीती’ वाटत नाही का, या प्रश्नावर ते सांगतात की, मालकांनीच तिकीट काढून दिले, मग लगेचच निघालो.

विशी-पंचवीशतला शत्रोहन कश्यप हा उत्तर प्रदेशमधील बरैली जिल्ह्य़ातील आपल्या गावी परत गेला होता. पण ‘गावात काम नाही. तिथे भुकेने मरावे लागले. त्यापेक्षा करोनाची भीती कमी आहे. कामासाठी मुंबईत येणे भागच आहे. मालकानेच तिकीट काढून दिल्याने येण्यात कोणतीच अडचण नव्हती,’ असे शत्रोहन सांगतो. गावात खात्रीशीर रोजगार नाही, त्यापेक्षा येथे १५ हजार नक्कीच मिळतात, असे सांगणारे शत्रोहनच्या गावातील १२ जणांच्या समूहाने सांगितले.

हे दक्षिण मुंबईतील दारूखाना भागातील फर्निचरच्या कारखान्यात काम करतात आणि तेथेच राहण्याचीही सोय आहे.

मेट्रोचे काम परत सुरू झाल्याने कंत्राटदारांनी परत बोलवायला सुरुवात केली. गावातील रोजगाराची मर्यादा आणि येथील कामातील कौशल्याचा अनुभव असल्याने मेट्रोच्या कामावरील सिव्हिल फोरमन नीरज यादव यांनी दीड महिन्यातच गावाहून परत आल्याचे सांगितले.

गावाकडे रोजगार हा केवळ शेतातच आहे. त्यातून मजुरी अगदीच कमी मिळते. तर दुसरीकडे मुंबईतील मालक स्वत:हून फोन करून बोलवत आहे आणि तिकीटदेखील काढून दिले आहे. त्यामुळे परत आलो, असे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्य़ातून आलेला धंजोय कुमार याने सांगितले.

विलगीकरणाच्या समस्येवर सोपा तोडगा परत आलेल्या मजुरांच्या हातावर रेल्वे स्थानकातच अलगीकरणाचे शिक्के मारले जातात. येणाऱ्या बहुतांश कामगारांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था असते. त्यामुळे आम्हाला तेथून बाहेर पडायची गरजच नसल्याचे कामगारांनी सांगितले. अशी व्यवस्था नसलेले, मात्र विलगीकरणात खरंच राहतात का, याबाबत संदिग्धताच आहे.