राज्यात सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या १० लाख २७ हजार उद्योगांमध्ये एक लाख ६५ हजार ६२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यात ६० लाखांहून अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी २५ टक्के रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली असल्याचे देसाई यांनी सांगितले.

राज्यातील सर्व विभागांमध्ये नवीन उद्योगांमध्ये गुंतवणुकीत वाढ झाली आहे. मराठवाडा विभागात एक लाख आठ हजार ६७४ उद्योग सुरू झाले. त्यामध्ये १७ हजार ६६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून पाच लाख ८० हजार ५०७ रोजगार निर्माण झाला आहे. तर विदर्भात एक लाख ९४ हजार ४२० उद्योग सुरू करण्यात आले असून त्यामध्ये १८ हजार २३६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यात सहा लाख ३७ हजार ४०९ इतकी रोजगार निर्मिती झाली असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र या दोन महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली त्यामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारापैकी अनेक उद्योग कार्यान्वित झाले आहेत.

युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेत उद्योजकांवर पडणारा व्याजाचा भार कमी करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे ५० हजार युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे, असे देसाई यांनी सांगितले.