मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या पश्चिम कार्यालयातर्फे चारकोप येथील खारफुटी क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र या स्वच्छता मोहिमेत खारफुटींमधून प्लास्टिकसोबतच मोठय़ा प्रमाणात दारूच्या बाटल्या गोळ्या करण्यात आल्याने खारफुटीसारख्या राखीव वनक्षेत्रात होणाऱ्या मद्य पाटर्य़ाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे क्षेत्र ‘म्हाडा’च्या अखत्यारीत येत असल्याने अशा अवैध गोष्टींवर कारवाई करण्यासाठी आपण बांधील नसल्याचे स्पष्टीकरण कांदळवन संरक्षण विभागाने दिले आहे.

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या वतीने रविवारी चारकोप सेक्टर आठ येथील खारफुटी क्षेत्रात स्वच्छतेचे काम करण्यात आले. निसर्गप्रेमी स्वयंसेवक आणि प्राणिमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हे काम पार पडले. या वेळी मोहिमेअंतर्गत सुमारे एक हजार किलो कचऱ्याचा उपसा करण्यात आला. मात्र या कचऱ्यामध्ये दारूच्या बाटल्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. खारफुटी क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा प्राप्त असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण वा अवैध काम करण्यास मनाई आहे. मात्र स्वच्छता मोहिमेअंतर्गत मोठय़ा प्रमाणात दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्याने या ठिकाणी दारू पाटर्य़ा होत असल्याचा दावा स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी केला आहे.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत साधारण एक किलो परिसराच्या अंतरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याची माहिती ‘पॉझ’ या संस्थेचे प्रमुख सुनिश कुंजू यांनी दिली. त्यामुळे खारफुटीसारख्या राखीव वनक्षेत्रामध्येही अवैध कामांसाठी मानवी हस्तक्षेप वाढल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. गेल्या पाच महिन्यांपासून कांदळवन संरक्षण विभागातर्फे मुंबईतील खारफुटी क्षेत्रात स्वच्छतेचे काम सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच चारकोप सेक्टर आठ येथील खारफुटींमध्ये स्वच्छतेला सुरुवात केल्याची माहिती कांदळवन संरक्षण विभागाच्या पश्चिम विभागाचे परिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली.

अवैध कामांवर कारवाई

वैयक्तिक किंवा शासनाच्या इतर विभागाच्या मालकीच्या खारफुटी क्षेत्रामध्ये कांदळवन विभागाकडूनच स्वच्छतेचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित क्षेत्र म्हाडाच्या मालकीचे असल्याने त्या ठिकाणी होणाऱ्या अवैध कामांवर लक्ष ठेवण्याचे आणि त्यावर कारवाई करण्याचा अधिकार त्यांचा असल्याचे कांदळवन संरक्षण विभागाच्या पश्चिम विभागाचे परिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी स्पष्ट केले.