इमूच्या चार पिल्लांचा जन्म; संसर्ग टाळण्यासाठी रुग्णालयात हलविले

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये (राणीची बाग) नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. सुमारे दोन दशकांपासून संग्रहालयात वास्तव्य असलेल्या इमू पक्षाच्या जोडीने चार पिल्लांना जन्म दिला आहे.  या नवजात पिल्लांची काळजी घेण्यात संग्रहालयाच्या वैद्यकीय विभागातील अधिकारी व्यस्त आहेत. पिल्लांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून त्यांना जन्मदात्यांपासून विलग करून रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.  इमू या पक्षाचे मूळ ऑस्ट्रेलिया खंडात आढळते. जगातील दुसऱ्या क्रमाकांचा आकाराने मोठा असलेला पक्षी आहे. या पक्ष्यांची वाढ साधारण ५ फुटांपर्यंत होते. तर वजन ४५ किलोच्या आसपास असते.  मे ते जून महिन्याच्या कालावधीत त्यांचे प्रजनन होते. हे पक्षी वर्षभरात सुमारे ३० ते ३५ अंडी  देतात. या पक्ष्यांमध्ये नर अंडी उबविण्याचे काम करतो आणि ५० ते ६० दिवसांच्या कालावधीत पिल्लांचा जन्म होतो. राणीच्या बागेत सुमारे २० वर्षांपासून इमूचे वास्तव्य आहे. सध्या या ठिकाणी चार इमू असून त्यापैकी १ नर, २ मादी आणि तीन वर्षांपूर्वी जन्मलेले एक पिल्लू आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पिंजऱ्यातील इमूच्या जोडीने टप्याटप्याने सुमारे १६ अंडी दिली होती. त्यानंतर अंडय़ांचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्याकरिता संग्रहालयाच्या वैद्यकीय विभागाने त्यातील काही अंडी कृत्रिम पद्धतीने उबविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही. पिल्लांची वाढ न झाल्याने उर्वरित अंडी नर इमूला नैसर्गिक पद्धतीने उबविण्यास देण्यात आली. त्यातील चार अंडय़ांमधून पिल्लांचा जन्म झाल्याची माहिती संग्रहालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. आणखी तीन अंडी नर इमू उबवीत आहेत. मात्र आता त्यातून पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पिल्लांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.