|| जयेश शिरसाट

पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा हे नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्याच्या तयारीत असले तरी शर्मा यांच्यावर बहुचर्चित लखनभय्या प्रकरण शेकू शकते. कारण या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे लखनभय्या यांचे बंधू शर्मा यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत.

सोमवारी गृह मंत्रालयाने शर्मा यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर केला. त्याबाबत गृहमंत्रालयाने राज्याच्या महासंचालक कार्यालयाला पाठवलेल्या गोपनीय पत्रात लखनभय्या प्रकरणाचा उल्लेख आहे. या प्रकरणात २१ आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. एकटे शर्मा निर्दोष ठरले होते. या निकालाविरोधात अ‍ॅड. गुप्ता यांच्यासह राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले. २०१५मध्ये उच्च न्यायालयाने ते दाखल करून घेतले. या अपील याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत शर्मा यांना निवृत्तिवेतन मिळणार नाही, असे या पत्रात नमूद आहे.

शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. शर्मा यांच्यावर शेकलेले किंवा अजूनही न्यायालयीन टांगती तलवार असलेले लखनभय्या प्रकरण पाठ सोडणार नाही असेच दिसते. कारण शर्मा यांना उमेदवारी मिळणार असेल तर राजकीय व्यासपीठावरही त्यांचा विरोध करेन. त्यांचे खरे रूप मतदारांसमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे अ‍ॅड. गुप्ता

यांनी स्पष्ट केले.  साथ देणाऱ्या साथीदार, सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे शर्मा सर्वसामान्य मतदारांचे आणि नागरिकांचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याबाबत शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले अद्याप राजकारणात उतरण्याचा, निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला नाही. अ‍ॅड. गुप्ता यांच्या भूमिकेबाबत मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

काय आहे लखनभय्या प्रकरण?

नोव्हेंबर २००६मध्ये जुहू येथील नाना-नानी पार्कजवळ लखनभय्याला चकमकीत ठार केल्याचा दावा पोलिसांनी केला. ही चकमक नसून हत्या आहे, संबंधित पोलीस पथकाविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी अ‍ॅड. गुप्ता यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल फेटाळल्यानंतर चकमकीची चौकशी उच्च न्यायालयाने रेल्वेच्या विशेष दंडाधिकारी न्यायालयाकडे सोपवली. या न्यायालयाने २००९मध्ये ही हत्याच असल्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला दिला. पोलीस पथकाने नवी मुंबईतून लखनसह त्याचा मित्र अनिल भेडा यांचे अपहरण केले. त्यानंतर लखनची हत्या करून चकमकीचा आभास निर्माण केला, या अहवालाआधारे उच्च न्यायालयाने शर्मा आणि पथकाविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी तत्कालीन पोलीस उपायुक्त केएमएम प्रसन्ना यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापनेच्या सूचना दिल्या. एसआयटीने ७ जानेवारी २०१०ला सर्वप्रथम शर्मा यांना अटक केली. जुलै २०१३मध्ये सत्र न्यायालयाने याप्रकरणी निकाल देईपर्यंत शर्मा कारागृहात  होते.