पक्की घरे तोडल्याने रहिवासी रस्त्यावर  *   दाद मागूनही मुख्यमंत्र्याकडून दखल नाही

वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या जमिनीवर बांधण्यात आलेली पक्की घरे तोडून त्या जागेवर झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात येत असल्याने २६२ कुटुंबांवर बेघर होण्याचा प्रसंग ओढावला आहे. विकासकाकडून पुरेशी पर्यायी निवासाची व्यवस्थाही करण्यात आली नसल्याने अनेक कुटुंबांना रस्त्यावर तंबू टाकून रहावे लागत आहे. या बेकायदा व जबरदस्तीने राबविण्यात येत असलेल्या योजनेबद्दल रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केली.परंतु त्याची दखल घेतली नसल्याने रहिवाशी हवालदिल झाले आहेत.

वांद्रे पूर्व येथील अलियावर जंग मार्गावर म्हाडाचा सिटी सर्वे नंबर ६१९ हा ६२७० चौरस मीटरचा भूखंड आहे. म्हाडाने हा भूखंड १९८० मध्ये वार्षिक १५९०० रुपये दराने ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ाने सिद्धार्थ कॉलनी हितसंरक्षण को.ऑप. हौसिंग सोसायटीला दिला होता. या गृहनिर्माण संस्थेने रितसर नोंदणी करुन भूखंडावर पक्की घरे बांधण्याची परवानगी घेतली. म्हाडाची जमीन असल्याने घरबांधणीसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने रहिवाशांना कर्ज दिले. त्यानुसार या जमिनीवर पक्क्य़ा चाळी बांधण्यात आल्या. मात्र त्याच जागेवर एसआरए योजना राबविण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये अंसतोष पसरला आहे.

मुळात जिल्हाधिकाऱ्यांनी झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती म्हणून घोषित केलेल्या जागेवर एसआरए योजना राबविली जाते. परंतु रहिवाशांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार वांद्रे तसहसिलदारांनी या जागेवरील बांधकाम हे गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही, असे म्हटले आहे. या जागेवर झोपडय़ा असत्या तर बॅंकेने कर्ज दिले असते का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरे असे की भाडेपट्टय़ाची मुदत २०१० पर्यंत होती, मात्र भाडेपट्टा रद्द केला आहे किंवा नाही याबद्दल म्हाडाने रहिवाशांना काहीही कळविले नाही. मात्र त्या आधीच २००६ ला झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने पुनर्विकासाला मान्यता दिली आहे. या संदर्भात गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधला असता, झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यासाठी झोपडपट्टी घोषित करण्याचे बंधन नाही, असे त्यांनी सांगितले. रहिवाशांनी हे प्रकरण गृहनिर्माण प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर मांडले. त्यावर सुनावणी झाली आहे, परंतु समितीने अजून आपला निर्णय जाहीर केलेला नाही.