जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : घाटकोपरच्या छेडा नगर येथील संरक्षित, प्रतिबंधित कांदळवनावर भरणा करून नवी वस्ती उभी करण्याची धडपड वेगाने सुरू आहे. कांदळवनाला लागून असलेल्या घाटकोपर-मानुखर्द जोडरस्त्यावरील पदपथावर असंख्य झोपडय़ा उभ्या राहिल्या असून त्या दुकाने, गॅरेज असे व्यवसायही सुरू झाले आहेत. ही वस्ती कांदळवनांच्या कत्तलीसोबत वाहनांच्या रहदारीत अडथळा ठरू लागली आहे.

‘संरक्षित वन’ असे सांगणारी पाटी सोडल्यास वनविभागाने कांदळवनांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना के लेली नाही. वन विभागासह महापालिका आणि पोलिसांनीही काणाडोळा के ल्याने जोडरस्त्याच्या पदपथावर(छेडा नगरजवळील) झोपडय़ांची रांग उभी राहिली. आता या झोपडय़ांमागील कांदळवनात किं वा वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या भूभागावर भरणा घालून झोपडय़ांची दुसरी, तिसरी रांग उभारली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी अवैध उभारण्यात आलेल्या वस्त्यांमधील गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून छेडा नगर परिसरात चोऱ्या, घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. कांदळवनात अंमलीपदार्थ सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. त्याविरोधात तक्रोर के ल्यानंतर वनविभागाने महापालिके च्या मदतीने अवैध वस्ती हटविली होती. ही कारवाई करताना इमारत उभारणी किं वा अन्य प्रकल्पांमधील टाकाऊ साहित्य उदाहरणार्थ काँक्रि ट, वीटा, मातीचा ढिगारा अवैधरित्या टाकू न कांदळवनाचा जोडरस्त्या लगतच्या भागात भरणा करण्यात आल्याचे वनअधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. आता त्यापुढील भूभागात भरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

जोडरस्त्याच्या पदपथावर उभ्या राहिलेल्या झोपडय़ांमध्ये चहाच्या टपऱ्या, खाऊची दुकाने, वाहनांची डागडुजी करणारी गॅरेज सुरू झाली आहेत. त्यामुळे या वस्तीलगत रेंगाळणारी वाहने आणि नागरिकांची संख्या वाढली आहे. हा या जोडरस्त्यावरील रहदारीतील महत्त्वाचा अडथळा आहे. पूर्व मुक्तमार्गामुळे संध्याकाळी ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा लोंढा जोडरस्त्यावर उतरतो. छेडा नगर चौकातून पूर्व द्रुतगती मार्गाने ही वाहने मार्गस्थ होतात. या जोडरस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही मार्गिका अरुंद बनल्या आहेत. त्यातच पदपदाशेजारी अवैध उभी के लेली अवजड, हलकी वाहने, पदपथावरील अवैध वस्तीतून रस्त्यावर हात-पाय पसरू पाहणारे नागरिक यांमुळे दररोज येथे मोठी वाहतूक कोंडी होते.

छेडा नगर येथील कांदळवन किं वा त्याशेजारील अतिक्र मण वन विभागाने अनेकदा कारवाई करून हटविले आहे. या भूभागाच्या मालकी हक्कावरून संभ्रम आहे. त्यामुळे कारवाई करताना महापालिके लाही त्यात सहभागी करून घेतले जाते. या भागातील अतिक्र मणाबाबत तक्रोर प्राप्त झालेली नाही. तशी तक्रोर प्राप्त झाल्यास करोना संसर्गाचा जोर ओसरल्यावर निश्चित कारवाई के ली जाईल.

– डी. आर. पाटील, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष.

सेवा रस्ते गायब

जोडरस्ता उभारून पूर्ण झाल्यावर सुरुवातीच्या काळात दोन्ही मार्गिकांना प्रशस्त सेवा रस्ते देण्यात आले होते. मात्र छेडा नगरसमोरील मार्गिके शेजारी अतिक्र मण करून सुरू झालेला फरशांचा व्यवसाय, लॉज, गॅरेजसह विविध व्यवसायांनी सेवा रस्ता कब्जात घेतला. हीच परिस्थिती शिवाजीनगर, बैंगनवाडी, मंडाले आदी भागांमध्येही आहे. सेवा रस्त्याचा वापर रहदारीऐवजी पार्किंग आणि व्यवसायांसाठी के ला जातो.