कमी महत्त्वाची नियुक्ती म्हणून पाहिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालकपद स्वीकारल्यानंतरही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांनी या मंडळाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. मंडळाच्या मालकीच्या भूखंडावर काही प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पटनाईक यांनी याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
गोरेगाव येथील फायरिंग रेंज सुरू होण्याआधीच तेथील भिंत कोसळल्याची पटनाईक यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणी सल्ला देणाऱ्या कंपनीचे शुल्क थांबविले होते. त्यानंतर पटनाईक यांनी मंडळाच्या सर्वच सुरू असलेल्या प्रकल्पांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
या प्रकाराची चौकशी करता करता मंडळाचे काही भूखंड अतिक्रमित झाल्याचे निदर्शनास आले. अशा भूखंडांचा ते स्वत: आढावा घेणार आहेत. याच काळात अंधेरीतील एक भूखंड पोलीस गृहनिर्माणासाठी असल्याचेही पटनाईक यांच्या लक्षात आले.
वास्तविक वरळीतील एक भूखंड राजकारण्यांनी लाटल्याने त्याच्या बदल्यात अंधेरीत भूखंड देण्यात आल्याची पत्रे त्यांच्या पाहण्यात आली. त्यानंतर त्यांनीही शासनाला पत्र लिहून या भूखंडाची मागणी केली आहे. अशा पद्धतीने आणखी कुठे भूखंड आहेत का, याची तपासणी करण्यासही त्यांनी सांगितले आहे.