लोकसत्ता बदलता महाराष्ट्रमध्ये निमंत्रित अभ्यासकांची उपस्थिती

विविध क्षेत्रांचा ऊहापोह करणाऱ्या ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’च्या नव्या पर्वात ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हाने, त्यावर योजण्यात येणारे उपाय, त्यातल्या अडचणी यावर तज्ज्ञांची चर्चा सोमवारी रंगली .

ऊर्जा विषय तसा किचकट असला तरी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचाही आहे. त्यामुळे या विषयावर साधकबाधक चर्चा करण्याच्या अपेक्षेने ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ कार्यक्रमात वीज क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ निमंत्रितांनी उपस्थिती दर्शवली होती. ऊर्जेसारख्या तांत्रिक विषयामधील अडचणींची मांडणीतज्ज्ञांनी अगदी नेमकेपणाने केली. उपस्थित श्रोते प्रश्नांच्या माध्यमांतून आपल्या शंकांचे समाधान करून घेत होते. अगदी सत्र संपल्यानंतरही गटागटांत रंगलेली चर्चा या क्षेत्राचे सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वच अधोरेखित करीत होती.

‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’च्या या दहाव्या पर्वाची सुरुवात केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या भाषणाने झाली. ऊर्जा क्षेत्राची दिशा जाणून घेण्यासाठी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. या वेळी ‘बदलता महाराष्ट्र’च्या नवव्या पर्वाच्या ‘दिशा नवउद्यमाची!’ या विशेषांकाचे प्रकाशन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. भारतातील वीजबचतीचे दाखले देत परदेशात आपल्या सरकारकडून योजण्यात येणाऱ्या उपायांबद्दल विशेष आकर्षण असल्याचे गोयल यांनी आवर्जून सांगितले, तसेच ऊर्जा क्षेत्रात सुधारणांकरिता सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.

दुसऱ्या चर्चासत्रामध्ये ‘ऊर्जा क्षेत्रातील सद्य:स्थिती आणि आव्हाने यांचा ऊहापोह करण्यात आला. या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले ‘प्रयास’चे शंतनू दीक्षित, राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार या वक्त्यांनी वीज वितरण धोरणावर प्रकाश टाकला. महाराष्ट्रातील वीज क्षेत्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर वास्तववादी प्रकाश टाकण्यास या सत्राचा निश्चितपणे फायदा झाला. वितरण कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याचा सूचक इशारा दीक्षित आणि होगाडे यांनी दिला असता महावितरण कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह संजीवकुमार यांनी केला.

तिसऱ्या सत्रामध्ये इंडियन एनर्जी एक्स्चेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक जयंत देव, माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सीआयआय पश्चिम विभागाचे निनाद करपे यांनी वीज क्षेत्राच्या नियमनाबाबतच्या विविध मुद्दे मांडले. वळसे-पाटील यांनी उद्योग क्षेत्रात विजेची मागणी घटल्याकडे लक्ष वेधले, तसेच शेवटच्या सत्रामध्ये जैन इरिगेशन्सचे संजीव फडणीस, अपारंपरिक ऊर्जाक्षेत्राचे तज्ज्ञ अभ्यासक गजानन जोशी आणि पॉवर बॅकअपचे तज्ज्ञ अभ्यासक शैलेश संसारे यांनी पर्यायी ऊर्जास्रोतांच्या वापर आणि विकासाविषयी मार्गदर्शन केले.