मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. याच पार्श्वभुमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशारा पोलिसांनी दिला आहे. याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरुवातीला ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

मनसैनिकाची आत्महत्या
राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याने कळव्यातील मनसैनिक प्रविण चौगुले याने आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय मानला जातो. या प्रकरणी पोलीस तपास करत असून पोलिसांनी मात्र अद्याप आत्महत्येचे कारण अधिकृतरीत्या सांगितलेले नाही.

राज ठाकरेंकडून शांततेचं आवाहन
राज ठाकरे यांनी कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे. केसेस आणि नोटीसांची मला सवय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणी कितीही डिवचायचा प्रयत्न झाला तरी शांतता राखा असा स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांनादेखील याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून सोमवारी ईडीकडून पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आज मंगळवारी राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. उन्मेष जोशीदेखील ईडी कार्यालयात हजर असून राजन शिरोडकर आणि त्यांची एकत्र चौकशी केली जात आहे.

‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅवण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस’ने (आयएल अॅाण्ड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली असून २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. ‘आयएल अॅण्ड एफएस’कडून कोहिनूर सीटीएनएल कंपनीने घेतलेल्या कर्जप्रकरणात राज यांच्या सहभागाबाबतची चौकशी ‘ईडी’ करीत आहे. दादर येथील कोहिनूर मिल नं. तीन ४२१ कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्वेअर’ विकसित करण्यासाठी ‘कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी उन्मेष जोशी यांनी स्थापन केली होती. राज, उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. परंतु नंतर राज यांनी या कंपनीतून अंग काढून घेत समभागही विकून टाकले होते. या संपूर्ण व्यवहाराची ‘ईडी’ चौकशी करत आहे.