News Flash

घरकामगारांसाठी कायदा केला, पण अंमलबजावणी कोठे?

माझा नवरा ८ वर्षांपूर्वी वारला, मी घरकाम करून माझ्या दोन मुलांना वाढवतेय

माझा नवरा ८ वर्षांपूर्वी वारला, मी घरकाम करून माझ्या दोन मुलांना वाढवतेय; परंतु महाराष्ट राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाने मातृत्व अनुदान नाकारलं.. माझी आई घरकामगार होती. तिचा मृत्यू झाल्यानंतर मंडळाने ३० हजारांची रक्कम देणे बांधील होते, पण मंडळाने रक्कम देण्यास नकार दिला.. माझ्या वयाची ५५ वर्षे पूर्ण झाली तरी मला वर्षांला मिळणारे सन्मानधन मंडळाकडून नाकारले जाते.. अशा एक ना अनेक प्रश्नांचा ऊहापोह मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या घरकामगारांच्या जनसुनावणीत करण्यात आला.
राज्य सरकारने २००८मध्ये घरकामगारांच्या कल्याणासाठी ‘राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ अधिनियम’ संमत केला. यानुसार राज्यातील सर्व घरकामगारांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या सदस्यांना मंडळाचे फायदे मिळणार असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसल्याचे उपस्थित घरकामगारांनी स्पष्ट केले. याउलट मंडळाने आम्हाला नेहमीच डावलले, अशी तक्रारही सदस्यांनी केली. या जनसुनावणीसाठी ५०० हून अधिक घरकामगार उपस्थित होते. शिक्षण नाही, कुठलाच आधार नसलेल्या स्त्रिया घरकाम करून स्वत:चे व आपल्या कुटुंबाचे पोट भरतात.
अशा वेळी शासनाने अशा असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना सुरक्षा देऊ केली. पण त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. शासनाने घरकामगारांना त्यांचा हक्क दिला नाही तर १ लाखांचा घरकामगारांचा मोर्चा घेऊन आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसू, असे आवाहन संस्थेचे सहसमन्वयक ज्ञानेश पाटील यांनी केले.
या जनसुनावणीत पटलावरील सदस्यांमध्ये ज्येष्ठ युनियन नेते एम. ए. पाटील, माजी सहाय्यक मुख्य महानगर दंडाधिकारी डी. के. सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड्. इंदवी तुळपुळे, घरेलू कामगार कल्याण मंडळाचे माजी सदस्य उदय भट उपस्थित होते.

दक्षता समितीची स्थापना
कामाच्या ठिकाणी अत्याचाराला बळी पडलेल्या घरकामगारांनी पोलिसात तक्रार दाखल केली तरी तुमचीच चूक असल्याचे सांगत त्याच्यांवर विश्वास ठेवला जात नाही. अशा वेळी महिला घरकामगारांना मदत मिळावी व त्यांचे प्रतिनिधित्व व्हावे यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 1:06 am

Web Title: enforcement of law for home servants still pending
Next Stories
1 ..तर ग्राहक न्यायालयाचे सर्व खटले सहकार न्यायालयाकडे वर्ग करू
2 उपाहारगृहांना सुधारित मार्गदर्शक तत्त्वे
3 आता चित्रपट दिग्दर्शकांकडून ‘पुरस्कारवापसी’
Just Now!
X