लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण मुंबईमधील मलबार हिल टेकडी आणि लगतच्या परिसरात ४ ऑगस्ट रोजी झालेल्या भूस्खलनामुळे आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. मात्र अथक प्रयत्न करून या भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविणाऱ्या पालिकेच्या जल अभियंता विभागातील अभियंते, कर्मचाऱ्यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असतानाच ४ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास कमला नेहरू पार्क येथून केम्प्स कॉर्नर चौकाच्या दिशेने जाणाऱ्या बी. जी. खेर मार्गालगतची संरक्षक भिंत भूस्खलनामुळे कोसळली. लगतच्या एन. एस. पाटकर मार्गाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे मलबार हिल जलाशयातून आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, पेडर रोड, केम्प्स कॉर्नर, एन. एस. पाटकर मार्ग या विभागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. पालिकेच्या जल अभियंता खात्याच्या विविध विभागांनी अहोरात्र काम करून जलवाहिनीची दुरुस्ती केली आणि पाणीपुरवठा पूर्ववत केला. या विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे अभियंते, कर्मचाऱ्यांचा मलबार हिल टेकडी जलाशय येथील प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जल अभियंता, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोड, उपजल अभियंता (बांधकामे), अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.