साहाय्यक प्राध्यापक पदाच्या उमेदवारांकडे हमीपत्राची मागणी

विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे कारण देत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना वेठीला धरण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. वेतन मिळत नसल्यामुळे चालणारी प्राध्यापकांची आंदोलने, न्यायालयीन प्रकरणे या सगळ्यावर अजब शक्कल लढवत काही संस्थाचालक साहाय्यक प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून ‘पूर्ण पगाराची मागणी करणार नाही’ असे हमीपत्र घेत असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील घटणाऱ्या विद्यार्थीसंख्येचे कारण पुढे करत नियमानुसार पगार देण्याचे संस्थाचालकांनी नाकारल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत नियमानुसार वेतन न मिळण्याचा कंत्राटी प्राध्यापकांच्याच पदरी येणारा अनुभव पूर्णवेळ नियमित प्राध्यापकांच्याही वाटय़ास येऊ लागला आहे. शासनाच्या, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार नियमित प्राध्यापकांना वेतन देणे आवश्यक असते. संस्थांकडून वेतन बुडवले जात असल्यामुळे राज्यभरात संस्थांच्या विरोधात सातत्याने आंदोलने होत आहेत. अनेक संस्थांच्या विरोधात प्राध्यापकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. मात्र, आता संस्थांनी ‘वेतन तर देणारच नाही, पण प्राध्यापकांनी आक्षेपही घ्यायचा नाही,’ अशी भूमिका घेतली आहे. साहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड करताना उमेदवारांकडून नियमानुसार पूर्ण पगार न मागण्याचे किंवा त्याबाबत कुठेही तक्रार न करण्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येत आहे.

हमीपत्रात काय?

  • ‘संबंधित पदाकरता विद्यापीठाची मान्यता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार मला विद्यापीठाची मान्यता मिळू शकेल. मान्यता मिळाल्यानंतर संस्था माझ्या पगाराबाबत जो निर्णय घेईल तो माझ्यावर बंधनकारक आहे.
  • सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शुल्क वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे भविष्यातही काही जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे, याची मला कल्पना आहे. विद्यापीठाकडून साहाय्यक प्राध्यापक पदासाठी मला मान्यता मिळाल्यास, नियमानुसार पगाराची रक्कम संस्था मला देऊ शकत नाही, याची मला जाणीव आहे.
  • अशा परिस्थितीत संस्था पगाराची जी रक्कम निश्चित करेल, ती मला मान्य असेल.
  • या रकमेबाबत मी कुठल्याही प्रकारे वाद निर्माण करणार नाही. संस्थेच्या नावाला व प्रतिष्ठेला हानी होईल असे कृत्य, न्यायालयीन कारवाई, शासनाकडे तक्रार दाखल करणे असे मी काहीही करणार नाही.
  • नियमाप्रमाणे पूर्ण पगाराची मागणी करणार नाही किंवा नियुक्ती कालावधीनंतर फरक मागणार नाही’ अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र प्राध्यापक पदासाठी मुलाखत देणाऱ्या उमेदवारांकडून लिहून घेतले जात आहे.