News Flash

अभियांत्रिकी शिक्षण आता बहुढंगी

केवळ ‘मटेरिअल’ वस्तूंचा उहापोह करणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभियंत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास करण्यासाठी सिनेमा आणि तत्त्वज्ञान, परदेशी संस्कृती, भाषा, सर्जनशील

| July 7, 2014 03:41 am

केवळ ‘मटेरिअल’ वस्तूंचा उहापोह करणाऱ्या अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभियंत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास करण्यासाठी सिनेमा आणि तत्त्वज्ञान, परदेशी संस्कृती, भाषा, सर्जनशील विज्ञान अशा आगळय़ावेगळय़ा विषयांचे धडेही आता अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये गिरविले जाणार आहेत. फ्रान्समधील २०० वर्षे जुन्या ‘इकोल सेन्थ्रॉल पॅरीस’ या विद्यापीठाशी हातमिळवणी करीत हैदराबादमधील एका शिक्षणसंस्थेने या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांतून केवळ तंत्रज्ञ तयार करण्यापेक्षा सर्वगुणसंपन्न असे ‘उद्योगक्षेत्रातील नेतृत्व’ (बिझनेस लीडर) घडवण्याच्या दृष्टीने अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार करण्यावर विकसित राष्ट्रांमधील नामांकित विद्यापीठांमध्ये भर दिला जात आहे. त्यात आपल्या विषयांबरोबरच इतर विद्याशाखांमधील वेगवेगळे विषय ठेवले जातात. तसेच विद्यार्थ्यांना त्याचे ठराविक क्रेडिट (श्रेयांक) वर्षांच्या शेवटी मूल्यांकन करताना दिले जातात. बदलाचे हे वारे आता परदेशी विद्यापीठाच्या सहकार्याने भारतातही वाहू लागले आहेत.
उच्चशिक्षणात आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन आणण्यावर विद्यापीठांनी भर द्यावा, असा ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’चाही (यूजीसी) आग्रह राहिला आहे. देशातील काही शिक्षणसंस्थांनी काही विद्याशाखांमध्ये हा दृष्टीकोन प्रत्यक्षातही आणला आहे. अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये या प्रकारचा आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन अद्याप विकसित झालेला नव्हता. हैदराबादमधील ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’ या उद्योग समूहाच्या ‘महिंद्र इकॉल सेन्थ्रॉल’ या संस्थेमध्ये मात्र अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच विविध प्रकारचे बहुढंगी विषयही विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहेत. अभियांत्रिकीच्या पारंपरिक ज्ञानाबरोबर कला आणि सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर विषयांचे धडे देणारी ही बहुधा देशातील पहिली शिक्षणसंस्था असावी.
‘समकालीन तंत्रज्ञानाबरोबरच त्या त्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. अभियांत्रिकीच्या पारंपरिक विषयांबरोबरच सिनेमा आणि तत्त्वज्ञान, परदेशी भाषा, संस्कृती, ‘क्रिएटीव्ह सायन्स’ आदी विविध विषयांचे अभ्यासक्रम संस्थेने तयार केले आहेत. ते त्या त्या सत्रात विद्यार्थ्यांना पूर्ण करायचे आहेत,’ असे संस्थेचे संस्थापक संचालक आणि कानपूर-आयआयटीचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी या अभ्यासक्रमांचे महत्त्व विशद करताना सांगितले.

अभ्यासक्रमाची आखणी
संस्थेला पाच वर्षांचा ‘डय़ुएल’ पदवी अभ्यासक्रम सुरू करायचा आहे. या पाच वर्षांपैकी अभ्यासक्रमाचा एक तृतीयांश इतका भाग गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानव्य, तत्त्वज्ञान, भाषा आणि संस्कृती या विषयांना वाहिलेला असेल. एक तृतीयांश भर अभियांत्रिकी शिक्षणावर असेल. तर उर्वरित शिक्षणाचा भर व्यापार आणि व्यवस्थापन, सॉफ्ट स्कील्स, प्रकल्प आणि इंटर्नशीप यावर असेल. अर्थात यासाठी वर्षांला चार लाख रुपयांपर्यंतचे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले जाणार आहे.
समकालीन तंत्रज्ञानाबरोबरच त्या त्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. अभियांत्रिकीच्या पारंपरिक विषयांबरोबरच सिनेमा आणि तत्त्वज्ञान, परदेशी भाषा, संस्कृती, ‘क्रिएटीव्ह सायन्स’ आदी विविध विषयांचे अभ्यासक्रम संस्थेने तयार केले आहेत. ते त्या त्या सत्रात विद्यार्थ्यांना पूर्ण करायचे आहेत.
-प्रा. संजय धांडे, संस्थेचे संस्थापक संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 3:41 am

Web Title: engineering education now with variation
Next Stories
1 काँग्रेस नेत्यांची ‘सहकारा’तून समृद्धी!
2 प्रवासी अमाप, तोटा वारेमाप!
3 महागाईविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
Just Now!
X