दर्जेदार शिक्षणाअभावी तसेच नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे देशभरातील सुमारे २०० हून अधिक अभियांत्रिकी संस्थांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’कडे (एआयसीटीई) अर्ज केले असून, यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत देशभरात अभियांत्रिकी शिक्षणाच्या जवळपास सव्वा लाख जागा कमी होणार आहेत.

एआयसीटीईने अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कठोर पावले उचलली असून, अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्डा’ची(एनबीए) श्रेणी घेणे सक्तीचे केले आहे. एकीकडे अभियांत्रिकीच्या आयटी, ईएक्सटीसीसह अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास विद्यार्थी तयार नाहीत, तर दुसरीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी एआयसीटीईने कठोर पावले उलचल्यामुळे अनेक संस्थांनी आपली महाविद्यालये बंद करणे पसंत केले आहे. यंदा देशभरातील सुमारे २०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे परवानगी मागितल्याची माहिती एआयसीटीईच्या सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात अभियांत्रिकीची एकूण ३६० महाविद्यालये असून यंदा २७ महाविद्यालयांनी आपली महाविद्यालये बंद करण्यासाठी परवानगी मागितली असून, त्यातील १६ संस्थांना अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने केली आहे. याशिवाय सात तंत्रनिकेतन बंद करण्याचीही शिफारस केल्याचे राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. यामुळे राज्यातील अभियांत्रिकीच्या सुमारे साडेचार हजार जागा कमी होतील, असेही डॉ. वाघ म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत अभियांत्रिकीच्या जागा एक लाख ७५ हजारांवरून कमी होत यंदा एक लाख ३८ हजार एवढय़ा झाल्या आहेत. पुढील वर्षीपर्यंत यात आणखी कपात होणार आहे.

देशभरात सुमारे साडेतीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालये असून २०१५-१६ मध्ये १६ लाख ४७ हजार प्रवेश क्षमता होती. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरातील महाविद्यालयांमध्ये सातत्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत होती.

साधारणपणे एकूण जागांच्या ५० ते ५२ टक्के एवढेच प्रवेश होत असल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू ठेवणे हेही एक मोठे आव्हान महाविद्यालयांपुढे निर्माण झाले होते. परिणामी, गेल्या वर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील ८०० हून अधिक अभ्यासक्रम बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील महाविद्यालयांनी ४१० अभ्यासक्रम बंद करण्यासाठी परवानगी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

एनबीएमान्यतेबाबत एआयसीटीईआग्रही

अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘एनबीए’मान्यता घेण्याबाबत एआयसीटीईने आग्रही भूमिका घेतली असून सध्या देशभरात केवळ १० टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे एनबीएची श्रेणी असून पुढील वर्षी हे प्रमाण १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०२२ पर्यंत ५० टक्के अभियांत्रिकी संस्था या एनबीएची श्रेणी घेतील असे उद्दिष्ट ठेवले आहे.