राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या ‘अनिवार्य’ विषयांच्या यादीतून ‘रसायनशास्त्रा’सह ‘इंग्रजी’ हा विषय देखील वगळण्यात आला आहे. तसेच, ‘पीसीएम’ या विषयगटातील ‘रसायनशास्त्र’ या विषयाला जीवशास्त्रासह व्होकेशनल विषय घेतलेल्यांनाही पात्र ठरविण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिलेल्या निकालाचा आधार घेऊन हे बदल २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांपासूनच लागू करण्यात येणार असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
या नव्या नियमांनुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकीसाठी अर्ज करण्याची मुदत १३वरून १५ जूनपर्यंत वाढविली आहे. १५ जूनपर्यंत सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटीबरोबरच इयत्ता बारावीच्या परीक्षेत भौतिकसास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयगटात किमान ४५ टक्के गुण (मागासवर्गीयांसाठी ४०टक्के) असणे बंधनकारक आहे. तसेच, बारावीला इंग्रजी हा विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. जुलै, २०१२मध्येच ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) या नियमांमध्ये बदल करून अनिवार्य विषयांच्या यादीतून इंग्रजीला वगळले. तसेच, पीसीएम विषयगटातील रसायनशास्त्राला जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, तांत्रिकी व्होकेशनल विषयांचा पर्याय उपलब्ध करून दिला. पण, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची अनिवार्यता कायम ठेवण्यात आली आहे. पण, या नियमाची अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी न करता पुढील वर्षांपासून करण्याचे ठरविल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत पीसीएममधील रसायनशास्त्र या विषयाला व्होकेशनल विषय ग्राह्य़ धरण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे.
गणित-विज्ञानाच्या फारच कमी लागलेल्या निकालामुळे ४५ टक्क्य़ांची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यास असमर्थ ठरलेल्या काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, सीईटीत कितीही गुण असले तरी ४५ टक्क्य़ांच्या अटीमुळे काही विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रवेशाची संधी हुकणार होती.
विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकसास्त्र या पारंपरिक विषयांपेक्षा कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल मेटेनन्स, आयटी हे व्होकेशनलचे विषय स्कोरींग असतात. त्यामुळे विषयगटातून रसायनशास्त्र वगळून त्यात व्होकेशनल विषयाचे गुण समाविष्ट केल्यास अनेक विद्यार्थी ४५ टक्क्य़ांची ‘मॅजिक फिगर’ गाठू शकतील.