तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या इतर अभ्यासक्रमांप्रमाणे अभियांत्रिकी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमांनाही यंदा प्रथमच राबविण्यात आलेल्या फ्लोट, फ्रीज आणि स्लाइड नामक प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींचा फटका बसतो आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट ही प्रवेश प्रक्रिया आवरती घेण्याची मुदत नजिक आली तरी बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार जागांचे वाटपच होऊ शकलेले नाही.

एकतर आधीच थेट दुसऱ्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. त्यात इतर अभ्यासक्रमांप्रमाणे संचालनालयाने फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड ही पद्धती अवलंबली होती. फ्रीज म्हणजे जागावाटप झाले आहे आणि विद्यार्थी त्यावर समाधानी असेल. फ्लोट म्हणजे जागावाटप झाले आहे आणि विद्यार्थी त्यावर समाधानी नाही. त्याला अधिक चांगला पर्याय हवा आहे. परंतु, यात विद्यार्थ्यांला दुसऱ्या फेरीत अधिक चांगला पर्याय मिळेपर्यंत संबंधित जागा विद्यार्थ्यांच्या नावाने ‘ब्लॉक’ राहते. तर स्लाइड म्हणजे विद्यार्थ्यांला जागा वाटप होते. संबंधित विद्यार्थी महाविद्यालयावर समाधानी आहे, मात्र त्याला त्याच महाविद्यालयात अधिक चांगल्या शाखेला प्रवेश हवा आहे. चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, पहिल्या फेरीत बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांनी फ्लोटचा पर्याय निवडल्याने बहुतेक करून सर्वच जागा ‘ब्लॉक’ झाल्या. त्यामुळे, पहिल्या फेरीत जागावाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाताला दुसऱ्या फेरीतही काही लागले नाही. हाच प्रकार तिसऱ्या फेरीबाबतही झाला, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पुढेच सरकत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

आता चौथी फेरी ही समुपदेशनाची असणार आहे. परंतु, या प्रवेश फेरीतही जागावाटप झाले किंवा नाही झाले तरीही विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. म्हणजे सर्वच विद्यार्थी यात सहभागी होतील. यात रिक्त जागांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना निवडीचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. मात्र, याही जागा गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकांवर असलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. त्यात यादीत खालच्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, अशी  शंका आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार संचालनालयाला ३० ऑगस्टपर्यंत सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संपवायची आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे फारच थोडय़ा विद्यार्थ्यांना या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचा फायदा होणार आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढे शेवटी संस्था स्तरावर भरमसाट देणगी शुल्क देऊन प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नसेल, अशी तक्रार एका विद्यार्थ्यांने केली.

ही परिस्थिती गेल्या वर्षी नव्हती. त्यावेळी थोडेच विद्यार्थी समुपदेशनाच्या प्रवेश फेरीपर्यंत येत. उर्वरित बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार केंद्रिभूत प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळून जात. महत्त्वाचे म्हणजे नव्या नियमांचा फटका अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशांनाही बसला होता. त्यापासून धडा घेऊन संचालनालयाने हे नियम बदलायला हवे होते, अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.