उद्योगप्रधान व कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी तयार करणार

संदीप आचार्य, मुंबई</strong>

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेतून उद्योगप्रधान व कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, यासाठी प्रथम अध्यापकांना प्रशिक्षित करण्याची योजना उच्च व तंत्रशिक्षण संचलनालयाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत जवळपास पाच हजार अध्यापकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

देशभरातील साडेतीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालयांतून दरवर्षी सुमारे २० लाख अभियंते बाहेर पडतात. मात्र प्रत्यक्षात यातील साडेतीन लाख जणांनाच नोकरी मिळत असल्याचे एआयसीटीईच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

नोकऱ्या मिळत नसल्यामुळे यंदा राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या शाखांच्या तब्बल ५७ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. यात सिव्हिल व मॅकॅनिकल अभ्यासक्रमाच्या जागांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. याची गंभीर दखल घेत विद्यापीठे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील अध्यापकांच्या व्यावसायिक क्षमतेचा विकास करण्यासाठी ‘उच्च व तंत्रशिक्षण संचालनालया’च्या अखत्यारीत ‘अध्यापक प्रशिक्षण संस्था’ स्थापन करण्यात आली आहे.

या अध्यापक प्रशिक्षण योजनेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, कौशल्यविकास व शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव तसेच रुसाचे प्रकल्प संचालक, तंत्रशिक्षण संचालक, आदी नऊ जणांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पारंपरिक पद्धतीऐवजी उद्योगांच्या गरजांचा अभ्यास करून अध्यापकांना प्रशिक्षिण देण्यात येणार आहे. जगभरातील अनेक विद्यापीठे ही स्वयंअर्थसक्षम असताना भारतातील विद्यापीठांचा भार हा शासनालाच सहन करावा लागतो. पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम व शिक्षण-संशोधनावर भर दिला जातो. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे उद्योगप्रधान अभ्यासक्रम आणि त्या दृष्टीने अध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे अभिप्रेत असून, यासाठी अध्यापक प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.