खड्डय़ांच्या तक्रारीसाठी स्वत:चा क्रमांक देण्यास आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव

नागरिकांना खड्डय़ांची तक्रार करता यावी, यासाठी आपला मोबाइल क्रमांक जाहीर केल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या निवासी अभियंत्यांना पालिकेतर्फे स्वतंत्र अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल आणि सिमकार्ड देण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू झाला आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

मुंबईतील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याबाबत नागरिकांना तक्रार करता यावी आणि खड्डे लवकर बुजविण्यात यावेत, या उद्देशाने प्रशासनाने पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये निवासी अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन या निवासी अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नागरिकांना उपलब्ध केले होते. या मोबाइलवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे खड्डय़ांची छायाचित्रे आणि माहिती पाठविण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले होते. आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध केल्याबद्दल निवासी अभियंत्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच एका अभियंत्याने थेट साहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून नाराजीही व्यक्त केली. तसेच आपल्या मोबाइलवर येणाऱ्या तक्रारींसाठी आपण जबाबदार राहणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले होते.

या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यामुळे नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी निवासी अभियंत्यांना पालिकेतर्फे स्वतंत्र अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल आणि सिमकार्ड देण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा मोबाइल निवासी अभियंत्यांकडे राहील आणि त्यानंतर तो पालिकेच्या तक्रार निवारण कक्षातील अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव एक-दोन दिवसांमध्ये पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. नवे मोबाइल नंबर कार्यान्वित झाल्यानंतर तात्काळ तो जनतेला उपलब्ध केला जाईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.