ई-निविदा घोटाळा प्रकरणात अडकलेल्या २० अभियंत्यांना मंगळवारी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत दिली. अभियंत्यांवरील कारवाईची घोषणा मंगळवारी पालिका सभागृहात आयुक्त करणार आहेत. दरम्यान, यापूर्वी पालिका सभागृहात नगरसेवकांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल कुंटे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ई-निविदा घोटाळा प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सोमवारी तातडीने महापौरांच्या दालनात गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, भाजपचे गटनेते मनोज कोटक, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर आणि पालिका आयुक्तांसह चारही अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते. पालिका सभागृहात नगरसेवकांनी थेट आपल्यावर केलेल्या आरोपांबाबत कुंटे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सभागृहात वेळीच निवेदन करण्यात आले असते तर ही वेळ आली नसती, असा युक्तिवाद करीत गटनेत्यांनी आयुक्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
ई-निविदा घोटाळाप्रकरणी मंगळवारी पालिका सभागृहाच्या बैठकीत निवेदन करण्याचे आश्वासन कुंटे यांनी या बैठकीत दिले.
गेल्या वर्षभरात ई-निविदा पद्धतीद्वारे छोटी-मोठी अशी सुमारे १७,००० कामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे २०० ते २५० कामांमध्ये घोटाळा झाल्याचा संशय असून त्याची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीअंती ४९ कामांमध्ये सुमारे सहा ते आठ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती कुंटे यांनी या वेळी दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आबेरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.