‘लोकसत्ता’च्या वृत्ताची पालिका आयुक्तांकडून दखल

राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि विकासक यांच्या आशीर्वादामुळे वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या ७८७ अभियंत्यांची नियमानुसार बदली करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी दिले. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने मंगळवारीच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल देत आयुक्तांनी बदलीचे आदेश दिले. त्यामुळे वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांसह संबंधित राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि विकासक यांचेही धाबे दणाणले आहेत.

पालिकेतील विविध विभागांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम तब्बल ७८७ अभियंत्यांच्या बाबतीत मोडीत काढण्यात आला असून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी हे अभियंते एकाच विभाग कार्यालयातील एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यामध्ये १८९ कनिष्ठ अभियंते, ४१९ दुय्यम अभियंते (स्थापत्य), ९३ साहाय्यक अभियंते (स्थापत्य) आणि ८६ साहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विकास) यांचा समावेश आहे.

याबाबत ‘लोकसत्ता, मुंबई’ या सहदैनिकात बुधवारी ‘पालिकेच्या ७८७ अभियंत्यांचा वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत अजोय मेहता यांनी ७८७ अभियंत्यांची चौकशी करून तात्काळ बदली करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आपल्यासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांची बदली करण्यात येणार असल्याने राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार आणि विकासक यांचेही धाबे दणाणले आहेत. आपल्या विश्वासातील अभियंत्याची होणारी बदली रोखण्यासाठी या मंडळींनी हालचाली सुरू केल्याचे समजते.

दरम्यान, जल विभागांमध्ये काही कामे तांत्रिकदृष्टय़ा किचकट आहेत. ही कामे सर्वच अभियंत्यांना जमत नाहीत.

त्यामुळे जल विभागात काही अभियंते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांची बदली केल्यास तांत्रिक कामाची अडचण होऊ शकते. त्यामुळे जल विभाग वगळता अन्य विभागात ठिय्या मांडून बसलेल्या अभियंत्यांची बदली करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.