गणेशोत्सव काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकरिता ९ ते १२ सप्टेंबर अशी चार दिवसांची सुटी आयत्या वेळेस जाहीर केल्याने अनेक शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. गणेशोत्सवासाठी ९ आणि १० सप्टेंबरला शिक्षण उपसंचालकांनी सुटी जाहीर केली होती. काही इंग्रजी शाळांनी गणेशोत्सवाकरिता परिपत्रकानुसार केवळ दोनच दिवस सुटी  जाहीर केली. तर काही इंग्रजी शाळांनी ९ सप्टेंबर अशी एकच दिवस सुटी  दिली होती. नाताळमध्ये मोठी सुटी  देणाऱ्या शाळा गणेशोत्सव काळात केवळ एक किंवा दोन दिवसाची सुटी  देतात म्हणून ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सव काळात ९ ते १२ सप्टेंबर अशी सुटी  देणे शाळांना बंधनकारक करावे, अशी मनविसेची मागणी होती. उपसंचालकांनी या मागणीची दखल घेत सर्व इंग्रजी शाळांनी ९ ते १२ सप्टेंबर अशी सुट्टी द्यावी, असे परिपत्रक काढले आहे. पण, सुटय़ा आयत्यावेळी जाहीर केल्याने शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.