राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेऊन मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक गुरुवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
देशमुख म्हणाले की, मनोरंजन क्षेत्र विस्तारले आहे, मात्र त्याबाबतचे धोरण असणे गरजेचे आहे. चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच, लोककला, माहितीपट, जाहिरातपट यांचा या धोरणात समावेश करण्यात येणार असून दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात यावे. ते सांस्कृतिक कार्य विभागाला सादर केल्यानंतर ते मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 23, 2020 12:01 am