उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेले रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न सोडविले तरी कोणत्याही सबसिडीशिवाय उद्योगविश्व आपली प्रगती साधेल. कारण उद्योगांच्या विकासामुळेच महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून पुढे येऊ शकेल, अशी अपेक्षा ‘बदलता महाराष्ट्र’ च्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील आघाडीच्या उद्योजकांनी व्यक्त केली.
‘उद्योगांचे स्थलांतर किती खरे, किती खोटे?’ या कळीच्या प्रश्नावर आयोजिण्यात आलेल्या या परिसंवादात ‘कायनेटीक समूहा’चे अध्यक्ष अरुण फिरोदिया आणि ‘जैन इरिगेशन सिस्टीम्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन सहभागी झाले होते. या दोन वक्तयांनी या विषयावर आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तत्पूर्वी राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या मुद्दय़ांवर उभयतांनी विस्तृत विवेचन केले.
‘अनेकदा राजकीय नेत्यांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये उद्योगांना संधी दिली म्हणजे उपकार केले अशा भावना असते. ते दूर करून उद्योग विकासासाठी आवश्यक असलेली दूरगामी धोरणे, क्षमता आणि एकात्मिक समतोल साधणारा दृष्टिकोन जरी बाळगला तरी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर बनेल,’ अशी भावना जैन यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्रात असलेल्या कृषि विद्यापीठांचा शेती व त्यावर आधारित व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. केवळ बदल्या, बढत्या, नेमणुका यातच ही विद्यापीठे अडकून पडली आहेत,’ अशा थेट शब्दांत हल्ला चढवून महाराष्ट्रातील कृषि क्षेत्राशी पूरक व्यवसायांच्या वाढीतील अडचणींची जाणीव जैन यांनी करून दिली.
‘विविध उद्योगधंद्यांच्या समूह विकासाचा (क्लस्टर) मार्ग हा आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरेल. या क्लस्टरमध्ये त्या उद्योगसमूहाला आवश्यक ते मनुष्यबळही त्याच ठिकाणी निर्माण होईल याची तरतूद केली गेली पाहिजे. तसेच, या क्लस्टरचा निर्यातीच्या दृष्टीकोनातून विचार व्हायला हवा,’ अशी अपेक्षा अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केली.

उद्योजकांच्या अपेक्षा
* उद्योगांचा समूह विकास
* कामगार कायद्यात, कर प्रणालीत सुधारणा
* वस्तू आणि सेवा कराची मागणी
*  सलग आणि स्वस्त वीजपुरवठा
* जकात आणि एलबीटीला पर्यायी करव्यवस्था
*  उद्योगांना मालमत्ता करातून सवलत
*  करारपत्रात बदल केल्यास वारंवार भराव्या लागणाऱ्या स्टॅम्प डय़ुटीतून सवलत
*  एमआयडीसी परिसरात निवासी बांधकामाला परवानगी
* सौर उर्जेला प्रोत्साहन
*  अन्न प्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणे व्यवसायांना प्रोत्साहन
*  एक खिडकी योजना
*  उत्पादनांना बाजार मिळवून देण्यासाठी

शेतीचा पाया मजबूत हवा
उद्योगांच्या विकासाकरिता एका मजबूत अशा शेती यंत्रणेचा पाया आधी भरायला हवा. त्यासाठी उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रामध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे.