‘पर्यावरणस्नेही घरगुती गणेशोत्सव स्पध्रे’चा पारितोषिक वितरण सोहळा
‘चौदा विद्या आणि चौसष्ट कलां’चा अधिपती आणि सांस्कृतिक चळवळीचा राजा असलेल्या ‘बाप्पा’च्या स्थापनेला कल्पकता आणि पर्यावरणपूरकतेची जोड देऊन सणाचे पावित्र्य जपणाऱ्या गणेशभक्तांचा गुरुवारी ‘पर्यावरणस्नेही घरगुती गणेशोत्सव स्पध्रे’च्या माध्यमातून गौरव करण्यात आला. मुंबई विभागातून ‘इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पध्रे’चे प्रथम पारितोषिक दत्तात्रय कोठूर, तर द्वितीय पारितोषिक अंजना राठी यांना प्रदान करण्यात आले. तर एकूण ३३ स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. हा सोहळा नरिमन पॉइंट येथील ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या ‘रंगस्वर’ सभागृहात गुरुवारी सायंकाळी अपूर्व उत्साहात पार पडला.
‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या वतीने ‘इकोफ्रेंडली घरचा गणपती सजावट २०१५’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या परितोषिकांचे स्वरूप, प्रथम पारितोषिकास रोख ९९९९ रुपये, तर द्वितीय पारितोषिकास रोख ६६६६ रुपये, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह असे होते. या पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, पर्यावरण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मालिनी शंकर, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’चे अध्यक्ष चंद्रकांत वझे व डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीकांत कदम, ‘सॅन्सुई’चे विपणन व्यवस्थापन राहुल जयस्वाल आणि ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सह-संपादक दिनेश गुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
जल, वायू आणि ध्वनिप्रदूषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मोठय़ा प्रमाणावर गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो. मात्र या वातावरणातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध कल्पना लढवीत काही भक्त या सणाचे पावित्र्य जपण्याचे कार्य करीत आहेत. अशा गणेशभक्तांनी त्यांच्या स्तरावर चालविलेल्या लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ गेली आठ वर्षे ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’चे आयोजन करीत आहे. या स्पर्धेसाठी ‘सॅन्सुई’ आणि ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे सहप्रायोजक म्हणून लाभले. तर ‘चितळे डेअरी’ यांचीही स्पध्रेला साथ मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर आदी विभागांतून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चित्रफितीच्या माध्यमातून विजेत्यांनी साकारलेल्या देखाव्याचे व गणेशमूर्तीचे छायाचित्र प्रेक्षकांना पाहता आले.

‘लोकांना दंड केल्याशिवाय लोक नियम पाळत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी स्वत:हून जबाबदारी स्वीकारायला हवी. अशा उपक्रमांच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहील यात काही शंका नाही,’ असे मत राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी मांडले. ‘सद्य:परिस्थितीकडे गांभीर्याने न पहिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे आतापासून प्रत्येक व्यक्तीने किमान दहा जणांना निसर्ग संवर्धनासाठी प्रोत्साहित करावे,’ असे आवाहन मालिनी शंकर यांनी केले. ‘रसायनाचा वापर करून आपण निसर्गाचे नुकसान करीत आहोत. निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टी देत असताना आपण मात्र त्या बदल्यात केवळ कचरा देत आहोत. मात्र परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात चांगल्या गोष्टी घडतील,’ असा विश्वास पी. अन्बलगन यांनी व्यक्त केला. तर ‘राष्ट्रप्रेम हे केवळ १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीपुरते न दाखवता, खरंच राष्ट्रप्रेम असेल तर रोज पाच लिटर पाणी आणि वीज वाचवायला शिका! अज्ञानाची जाण झाली की ज्ञानाच्या गोष्टीच घडतात. त्यामुळे उज्ज्वल राष्ट्र घडवायचे असेल तर स्वत:पासून सुरुवात करा,’ असा सल्ला संजय भुस्कुटे यांनी प्रोत्साहित केले.
‘हल्ली वर्तमानपत्रांच्या गर्दीत आणि ‘ब्रेकिं्रग न्यूज’च्या काळात केवळ लोकांपर्यंत बातमी पोहोचवणे हा एकमेव उद्देश न ठेवता समाजात जे जे चांगलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे माध्यम म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ होण्यासह पर्यावरण पूरक लोकचळवळ निर्माण व्हावी हा हेतू आहे,’ असे दिनेश गुणे यांनी सांगितले.
या सोहळ्यात ‘मिती क्रिएशन्स’निर्मित ‘हे गणनायक’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करणार करण्यात आला. ‘ओम नमोजी आद्या’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्याच गाण्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. टाळ्यांचा कडकडाट करून प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. गायिका आनंदी जोशी आणि गायक डॉ. राम पंडित या तरुण गायकांनी सादर केलेली ‘प्रथम तुला वंदितो’, ‘चिंब भिजलेले’, ‘सूर निरागस हो’ या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. तसेच ‘घन घन माला’, ‘हासरा नाचरा’ या गाण्यांनीही प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. या सोहळ्यात प्रशांत लळीत, अमेय ठाकूरदेसाई, विजू तांबे आणि अनिल गावडे या वादक कलाकारांनी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी, तर गुणे यांनी आभारप्रदर्शन केले.

मुंबई विभाग विजेते
प्रथम पारितोषिक – दत्तात्रय कोठूर
द्वितीय पारितोषिक – अंजना राठी

उत्तेजनार्थ
अनिकेत वैती, वेदांत सावंत, संतोष वर्टेकर, जया बाहेकर, विनायक अत्रे, आनंद लेले, सुहास यंदे, मंजिरी दांडेकर, भक्ती विपट, आतीश पाटील, अमेय वैद्य, अनिकेत पाटील, अर्चना यंदे, अशोक िशदे, दत्तात्रेय म्हात्रे, सुहास गुर्जर, देवेन्दु सावंत, दिनेश कदम, गणेश उल्हाळकर, हर्षल भंडारी, हर्षल शिनकर, जीवन कोलवणकर, ज्योती अधिकारी, मानसी सोनक, मौशमी सराफ, मीनल पॉल, नीलेश पाताडे, सतीश मयेकर, शिवानी मुजुमदार, श्रीराम शिवडेकर, सुनेत्रा परब, स्वप्नजा आहेर आणि उमेश पोतनीस