वसुंधरेचे संवर्धन आणि संरक्षणाची गरज ओळखून गिरगावमधील बेहरामजी जीजीभॉय पारशी चॅरिटेबल इन्स्टिटय़ुशन या शाळेने आपले १२५ वे वर्ष साजरे करताना शाळा आणि आसपासच्या परिसरात १२५ वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सोडला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, वृक्षवल्लींचे संवर्धन, झाडांचे महत्त्व आणि जपणूक करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्येच जनजागृती व्हावी म्हणून शाळेने वृक्षलागवडीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे.

पारशी आणि अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा वसा घेत बेहरामजी जीजीभॉय पारशी चॅरिटेबल इन्स्टिटय़ुशनने १८९१ मध्ये या शाळेची स्थापना केली. ही शाळा फक्त मुलांसाठी सुरू करण्यात आली होती. कालौघात मुलींनाही या शाळेची दालने खुली करण्यात आली. गिरगावमधील चर्नीरोड रेल्वे स्थानकासमोर असलेल्या या शाळेला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक भान राखत या शाळेने यंदा विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अलीकडेच पार पडलेल्या वार्षिक संमेलनात १२५ वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प मुख्याध्यापिका पावना अ‍ॅन्चिस यांनी सोडला आहे. त्याच वेळी शाळेतील सर्वात लहान मुलीच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करून या संकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शाळेमध्ये विविध विषयांवर वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रकल्प, कलाविषयक स्पर्धाचेही आयोजन केले जाते. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राला उत्तम क्रीडापटू देता यावेत या दृष्टीने ज्युडो, जिम्नॅस्टिक आदींचे प्रशिक्षणही शाळेत दिले जाते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी विविध शाळांमध्ये सध्या बॅण्ड पथकाला महत्त्व दिले जात आहे. या शाळेच्या बॅण्ड पथकाने आंतरशालेय आणि जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम पारितोषिक पटकावले आहे. जनजागृतीचे मोल ओळखून या शाळेने विश्वची माझे घर या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेले विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांनिमित्त द ब्रिटिश कौन्सिलने बेहरामजी जीजीभॉय पारशी चॅरिटेबल इन्स्टिटय़ुशनला ‘इंटरनॅशनल स्कूल’ पुरस्कार देऊन दोन वेळा सन्मानित केले आहे. हा बहुमान शाळेला २०१० आणि २०१४ मध्ये मिळाला आहे.

शाळेने १२५ वे वर्ष साजरे करताना आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ९ एप्रिल रोजी शाळेतच ‘आनंद मेळ्या’चे आयोजन केले आहे. या वेळी विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनाबरोबरच शिक्षक-पालक संघाचाही ‘आनंद मेळ्या’च्या आयोजनात मोठा सहभाग आहे. मोठय़ा पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवकथनातून विद्यमान विद्यार्थ्यांना एक नवा मार्ग मिळू शकेल, असा या ‘आनंद मेळ्या’मागे हेतू आहे. त्याचबरोबर पुढील वर्षभरात समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.