* दरवर्षी ९० हजार युनीट्सची बचत होणार * ’ १५ लाख रुपयांचा वीजेचा खर्च वाचणार
* ४२ हजार २०० युनीट्सच्या उर्जेची निमिती
देशातील उर्जेचे महत्व, उर्जेची सद्यस्थिती आणि भविष्यातील गरज विचारात घेऊन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने पर्यावरणस्नेही प्रकल्प उभारला असून यातून उर्जा संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता उभारलेल्या या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात उर्जेची बचत होणार आहे.
स्मारकाच्या या पर्यावरणस्नेही प्रकल्पातून दरवर्षी ५ लाख, २७ हजार २७६ लिटर्स इतक्या इंधनाची बचत होणार असून याममुळे १२४ कुटुंबाना सरासरी लागणारी उर्जा वाचविली जाणार आहे. ३ हजार ८९ इतक्या झाडांचेही जतन होणार आहे. ५८.६९ टन इतक्या प्रमाणात कार्बनही वाचणार आहे. प्रकल्पाची संपूर्ण संकल्पना स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची असून ‘सेन्स’ संस्थेचे संचालक संतोष सराफ यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
जागतिक तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. उर्जेची बचत करण्यासाठी सगळ्यांनी पावले टाकली पाहिजेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणाच्या पन्नासाव्या वर्षांच्या निमित्ताने सावरकर स्मारकाने हा प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पामुळे स्मारकाच्या वार्षिक नव्वद हजार युनीट्सची बचत होणार असून सुमारे पंधरा लाख रुपयांचा वीजेचा खर्च वाचणार असल्याचे रणजित सावरकर यांनी सांगितले.
प्रकल्पाअंतर्गत गच्चीवरील भागात रुफ टॉप ग्रीड इंटरॅक्टिव्ह सोलर फोटोव्होल्टिक सोल्यूशन प्रणालीतून उर्जानिर्मिती करण्यात येऊन त्यातून स्मारकाची वीजेची गरज भागणार आहे. हे सोलरसेन्स २६.६४ केव्हीपी मल्टी क्रिस्टीलाईन फोटोव्होल्टिक पॅनेलच्या माध्यमातून दरवर्षी ४२ हजार २०० युनीट्सची वीज निर्मिती करणार आहे. केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोएल यांच्या हस्ते १० ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘भारतातील उर्जेची सुरक्षा’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादात डॉ. महेश पाटणकर, रुमी इंजिननिअर, डॉ. एम. जी. घारपुरे, प्रा. डॉ. शिरीष केदारे ही तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.