संजय बापट

कुलाबा- वांद्रे- सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडच्या जागेवरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात वाद रंगला असतानाच पर्यावरणवाद्यांनीही या प्रकल्पास विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे.

कारशेडमुळे बाजूलाच असलेल्या रोहित पक्षी(फ्लेमिंगो) अभयारण्याला धोका असल्याचा आक्षेप घेत कांजूरमार्ग येथील ४३ हेक्टर जागेवर मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे जागेसाठी न्यायालयात भांडणाऱ्या केंद्र सरकारने या जागेवरील कारशेडच्या आरक्षणास मात्र कोणताही आक्षेप घेतलेला नसल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

या ठिकाणी कारशेड उभारण्याच्या कामास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. कांजूरमार्ग येथील जी ४३.७६ हेक्टर जमीन कारशेड उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास देण्यात आली आहे, त्या जमिनीवर विकास योजनेत सार्वजनिक बगीचा, उद्यान, परवडणारी घरे, पुनर्वसन, बेघरांसाठी घरे, पोलीस ठाणे, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, महापालिका शाळा, विद्युत वहन व वितरण सुविधा आणि रस्ते, यांचा समावेश करून ही जमीन त्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने अधिसूचना काढून हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. एक महिन्याच्या मुदतीत मेट्रो कारशेडविरोधात के वळ सहा हरकती दाखल झाल्या आहेत. त्यातील चार हरकती या पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या आहेत. कांजूरची ही जागा मिठागराची, दलदलीची असून तेथे खारफु टीही आहे. याला लागूनच कांजूरमार्ग- मुलुंडदरम्यानचे रोहित पक्षी अभयारण्य आहे. त्यामुळे या ठिकाणी कारशेड उभारल्यास पक्ष्यांच्या जीवनमानावर मोठा परिणाम होईल असा आक्षेप घेण्यात आला आहे.