News Flash

साथ नव्हती, तर मग जनजागृतीची गरज काय?

पावसाळ्यानंतर मुंबईकर डेंग्यू आणि हिवतापाने हैराण झालेले असताना मुंबईत साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव नसल्याचा कांगावा पालिकेकडून करण्यात येत होता.

| January 2, 2015 02:45 am

पावसाळ्यानंतर मुंबईकर डेंग्यू आणि हिवतापाने हैराण झालेले असताना मुंबईत साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव नसल्याचा कांगावा पालिकेकडून करण्यात येत होता. मात्र डेंग्यू आणि हिवतापविषयक जनजागृतीसाठी पालिकेने जाहिरातींपोटी तब्बल २१ लाखांहून अधिक रक्कम खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. साथ नव्हती, मग जनजागृतीच्या जाहिरातींची आवश्यकता काय होती, असा सवाल उपस्थित करून जाहिरातींच्या खर्चाच्या प्रस्तावांना विरोध करण्याची तयारी नगरसेवक करीत आहेत.
पावसाळ्यानंतर मुंबईमध्ये डेंग्यू आणि हिवतापाची मोठय़ा प्रमाणावर साथ पसरली होती. नगरसेवक आणि नागरिकांकडून ओरड होताच पालिकेने डेंग्यूच्या अळ्यांच्या शोधमोहिमेचे काम हाती घेतले होते.
डेंग्यू आणि हिवतापाविषयी जनजागृती व्हावी यासाठी पालिकेने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बेस्टच्या १३० बसगाडय़ांवर जाहिराती झळकविण्याचा निर्णय घेतला होता. बेस्टने जाहिरातीचे कंत्राट दिलेल्या मेसर्स राकेश अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीला पालिकेने अनुक्रमे १०,०५,६२२ रुपये आणि ३,२०,९०० रुपये मोजले.
जनजागृतीच्या जाहिरातींवर करण्यात आलेल्या २१,३५,५१४ रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीची अद्याप मान्यता मिळालेली नाही. प्रशासनाने या जाहिरातींच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीमध्ये सादर केले आहेत. दरम्यान, साथीचा प्रादुर्भाव झाला नव्हता, मग प्रशासनाने जनजागृतीच्या जाहिरातींवर का खर्च केला, असा प्रश्न नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:45 am

Web Title: epidemic fever dengue fever
Next Stories
1 मराठा आरक्षणाबाबत आणखी एक समिती
2 अन्नपदार्थावर कारवाई
3 मध्य, पश्चिम रेल्वे विस्कळीत
Just Now!
X