थंडीच्या ऋतूत खाल्ले जाणारे पदार्थ उन्हाळ्यातही खाल्ल्यास उष्णतेचे विकार बळावण्याची शक्यता असते. पण काही पदार्थ असे असतात जे सर्व ऋतूंमध्ये शरीराला फायदेशीर असतात. असाच एक पदार्थ म्हणजे हिरवे चणे. उन्हाळ्यामध्येही काळे आणि हिरवे चणे अधिक प्रमाणात खावेत, कारण त्याचा परिणाम थंड असतो. तसंच त्यामुळे पोटही जड होत नाही आणि भूकही शांत होते. तो नुसता खाण्यापेक्षा चटपटीत बनवून खायला लोकांना फार आवडतो आणि तसाच तो विकलाही जातो. साधारणपणे पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात मिळणारा हा पदार्थ सर्वाच्याच आवडीचा, बनवायला सोपा आणि चविष्टही. पण कुणी तुम्हाला सांगितलं की हा पदार्थ मुंबईत एके ठिकाणी गेली एक्कावन्न वर्षे आणि वर्षांचे ३६४ दिवस विकला जातो (होळीचा दिवस वगळता), तर काय? आश्चर्य वाटलं ना?

माटुंगा रेल्वे स्थानकावरून पश्चिमेला बाहेर पडल्यावर एस. हरलय्या चौकात उतरणाऱ्या फ्लायओव्हरच्या शेजारीच तुम्हाला सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत संतोष गुप्ता यांची चना-मसालाची गाडी लागलेली दिसेल. वाराणसीवरून मुंबईत उदरनिर्वाहासाठी आलेल्या वडिलांनी ५१ वर्षांपूर्वी ठेल्यावर सुरू केलेल्या या व्यवसायाचा आता चांगलाच जम बसला आहे. १९५२ साली संतोष यांचे आजोबा मुंबईत आले आणि त्यांनी माटुंगा परिसरातच शाळेच्या बाहेर बोरं, चिंच, करवंद पाटीतून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर काही काळाने संतोष यांच्या वडिलांनी तो व्यवसाय बंद करून उकडलेले हिरवे चणे विकायला सुरुवात केली. सुरुवातीला विश्वेश्वरय्या मंदिराच्या बाहेर १० वर्ष व्यवसाय केल्यानंतर आता तब्बल गेली ४१ वर्ष माटुंग्याच्या फ्लायओव्हरशेजारी संतोष यांची चना-मसालाची गाडी लागते. गाडीला महापालिकेचं लायसनदेखील आहे. संतोषच्या वडिलांचं वय आता पंचाहत्तर वर्ष असलं तरी ते दररोज आठ तास गाडीवर येऊन संतोषला मदत करतात. १९६२ साली चना-मसाला प्लेटची किंमत होती फक्त १ पैसे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले संतोष यांनी सहावीत असताना (१९८४ साली) गाडीवर कामाला यायला सुरुवात केली तेव्हा दीड रुपया प्लेट होती आणि आता प्रत्येक प्लेटची किंमत १५ रुपये आहे.

चना-मसालामध्ये इतर मोजकेच पदार्थ पडत असले तरी त्याची प्रत चांगलीच असावी असा संतोष यांचा हट्ट आहे. म्हणूनच सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होतो आणि रात्री १२ वाजता संपतो. पूर्वी केवळ दुपारनंतरच लागणरी गाडी लोकांचा प्रतिसाद पाहून गेल्या सहा वर्षांपासून सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते.

चणे शिजवण्यासाठी स्वच्छ पाणीदेखील घरून आणलं जातं. यामध्ये टाकण्यात येणारा गरममसाला, मिरचीपूड आणि पुदिन्याची चटणी घरीच तयार करण्यात येते. धणे, जिरं, काळीमिरी, दालचिनी यांचं मिश्रण असलेला गरममसाला दर आठवडय़ाला तयार करण्यात येतो. पुदिना चटणी मात्र दररोज तयार केली जाते. त्यात पुदिना, हिरवी मिरची आणि कोिथबीर असते. दिवसभरात सात ते आठ किलो चणे चना मसाला तयार करण्यासाठी लागतात.

गिऱ्हाईकांच्या आवडीनुसार आणि मागणीनुसार त्यांना कांदा, टोमॅटो, बटाटा हवा कि नको, तिखट, मीठ कमी-जास्त अशा प्रकारे सोयीनुसार चना-मसाला बनवून दिला जातो. इथला आलू-चाट हा प्रकारही प्रसिद्ध आहे. त्यामध्ये केवळ चणे टाकले जात नाहीत, बाकी सर्व मालमसाला सारखाच असतो. तिखट आणि चटकदार चना-मसाला खाऊन झाल्यावर तोंडाला लागलेली आग शमवण्यासाठी उकडलेला बटाटा हा गरममसाला आणि मीठ टाकून तुमच्या मुठीत टेकवला जातो. चना-मसाला पार्सल करण्याचीही पद्धत निराळी हिरव्या पानात आणि कागदामध्ये तो बांधण्यात येतो. त्यामुळे घरी जाईपर्यंत त्याला फारसं पाणी सुटत नाही आणि त्याचा चटपटीतपणाही टिकून राहतो.

चना मसाला कसा तयार होतो?

स्टोव्हवर शिजत असलेल्या कढईभर चण्यातून मूठभर हिरवे चणे हिरव्या पानामध्ये घेतले जातात. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकला जातो. मग उकडून बारीक काप करून ठेवलेला बटाटा पानावर घेतला जातो. त्यावर गरममसाला, मिर्ची पावडर, पुदिन्याची चटणी, मीठ टाकून लिंबू पिळला जातो. हे पदार्थ एकजीव करून हाताच्या तळव्यावर बसेल या आकाराच्या प्लेटमध्ये त्याचा डोंगर रचला जातो. त्यानंतर कढईत शिजत असलेल्या चण्याचा अर्क उतरलेलं चमचाभर गरम पाणी त्यावर टाकून ती चटकदार प्लेट तुमच्याकडे सोपवली जाते.

चण्याचं सूप

चण्याचं सूप हा अतिशय वेगळा प्रकारही इथे मिळतो. चना चटपटा किंवा चण्याची भाजी करण्यासाठी आपण हिरवे चणे उकडून घेतो व बहुतांशी त्याचे पाणी फेकून देतो. पण आपण हे विसरतो की, शिजवलेल्या चण्याचा अर्क पाण्यात उतरलेला असतो. आणि हा अर्क म्हणजे सर्दीवर जालीम उपाय. संतोषसुद्धा त्यामध्ये गरममसाला, मीठ, लिंबू आणि पुदिना चटणी असं मिश्रण करून ते छोटय़ाशा प्लेटमध्ये प्यायला देतात. गरमागरम आणि चटकदार सूप फार भारी लागतं.

कोणकोणते प्रकार मिळतात?

  • साधा चना-मसाला, जैन चना-मसाला, मिक्स चना-मसाला, आलू चाट, चण्याचं सूप. लहान मुलांसाठी तिखटाटी मात्रा कमी असलेला चना-मसाला बनवून दिला जातो. त्यामध्ये शिजवलेले चणे,लिंबू, मीठ आणि बटाटे टाकले जातात.
  • कुठे : एस हरलय्या चौक, माटुंगा फ्लायओव्हर शेजारी, माटुंगा (प.), मुंबई</li>
  • वेळ : सकाळी ९ ते रात्री १०