पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांमध्ये दहावी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असा भेदभाव करीत प्रशासनाने वेतनश्रेणी निश्चित केली आहे. परिणामी कामामध्ये समानता असताना केवळ दहावी अनुत्तीर्ण कामगारांना तब्बल तीन ते चार हजार रुपये वेतन कमी मिळत आहे. या दुजाभावामुळे सफाई कामगारांमध्ये दुही वाढत असून त्यातून संघर्षांची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कामगार संघटनांनीही या करारावर बेधडक स्वाक्षरी ठोकल्यामुळे कामगार नाराज झाले आहेत. प्रशासन, कामगार संघटनांच्या या भूमिकेमुळे सफाई कामगारांमधील असंतोषाचे पडसाद मुंबईच्या स्वच्छतेवर उमटू लागले आहेत.
भल्या पहाटे स्नानसंध्या उरकून सफाई कामगार मुंबईत झाडलोट करण्यासाठी घराबाहेर पडतात. सफाई चौकीवर सकाळी सातवाजता हजेरी लावून ते आपापल्या विभागात साफसफाई करण्यासाठी निघून जातात. साधारण ३० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ करण्यासाठी राबत असतात. सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अग्रहक्कक्रम धोरणानुसार (पीटी केस) त्याची पत्नी, मुलगा अथवा मुलीला घनकचरा व्यवस्थापन विभागातच सफाई कामगार म्हणून नोकरी दिली जाते. अनेक वेळा मृत सफाई कामगारांची पत्नी अथवा मुले दहावी उत्तीर्ण नसतात. तर काही प्रकरणांमध्ये त्यांची मुले पदवीधरही असतात. असे असतानाही नियमानुसार त्यांना सफाई कामगार म्हणून पालिकेच्या सेवेत रुजू व्हावे लागते.
प्रशासनाने २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दहावी उत्तीर्ण सफाई कामगाराला ५,२०० ते २०,२०० रुपये अधिक श्रेणी १८०० रुपये, दहावी अनुत्तीर्ण कामगाराला ४,४४० ते ७,४४० रुपये अधिक श्रेणी १३०० रुपये अशी वेतनश्रेणी देण्यात येत आहे. प्रशासनाच्या या विचित्र निर्णयामुळे कामगारांमध्ये दुही वाढू लागली आहे. दहावी उत्तीर्ण कामगाराइतकेच काम करून तीन-चार हजार रुपये वेतन कमी मिळत असल्याने दहावी अनुत्तीर्ण कामगार नाराज झाले आहेत. तर वेतन अधिक असल्याच्या बळावर दहावी उत्तीर्ण कामगार अनुत्तीर्ण कामगारांना तुच्छ लेखून आपल्या कामाचा भार त्यांच्यावर ढकलत आहेत. त्यामुळे उभयतांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचा कामावर परिणाम होऊ लागला आहे.
मात्र समान काम आणि असमान वेतनाच्या प्रश्नाकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे, तर सत्ताधारी आणि राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या कामगार संघटनांनीही दबावाखाली येऊन याबाबतच्या करारावर २०११ मध्ये स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावरून कामगारांमध्ये निर्माण झालेला वाद चिघळू लागला असून अस्वच्छतेच्या रूपात मुंबईकरांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.