|| सुशांत मोरे

आपत्कालीन बटणाचा प्रवाशांकडून गैरवापर; दोन महिन्यांत २८६५ वेळा ‘इमर्जन्सी ब्रेक’

ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांत बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांचा मध्य रेल्वेला मनस्ताप होऊ लागला आहे. सरकत्या जिन्यावर एखादा अपघात होत असल्यास मदतीसाठी बसवण्यात आलेले आपत्कालीन बटण उपद्व्यापी प्रवाशांकडून अकारण दाबले जात असून त्यामुळे ही यंत्रणाच बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेवरील १९ स्थानकांतील सरकते जिने अशा प्रकारे २८६५ वेळा बंद पडल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे स्थानकात सध्या आठ सरकते जिने अस्तित्वात असून या जिन्यांवरही असेच खेळ सुरू असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. अनेकदा हे जिने तांत्रिक दोषाऐवजी प्रवाशांच्या ‘हस्तक्षेपा’मुळे बंद पडत असल्याचा अनुभव आहे. दरम्यान, सरकत्या जिन्यांवरील हे प्रकार बंद व्हावेत यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची तयारी सुरू केली आहे.

मध्य रेल्वेवरील स्थानकांत एकूण ७१ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी जिन्यांचा चढउतार करणे कठीण असलेल्या वृद्ध वा अपंग प्रवाशांना हे जिने उपयुक्त आहेत. अन्य प्रवाशांकडूनही या जिन्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या जिन्यावरील ‘आपत्कालीन बटण’ या यंत्रणेला त्रासदायक ठरत आहे.

सरकत्या जिन्यावर एखादी समस्या उद्भवल्यास जिने थांबवण्यासाठी या जिन्यांना आपत्कालीन बटण पुरवण्यात आले आहे. हे बटण दाबताच जिने थांबतात व यासंबंधीची सूचना रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मिळते. मात्र, अनेकदा उपद्व्यापी प्रवासी विनाकारण हे बटण दाबत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरपासून नोव्हेंबपर्यंतच्या कालावधीत १८ स्थानकांतील जिने अशा प्रकारे २८६५ वेळा बंद पडले. लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील फलाट चार व पाचवरील सरकता जिना तर २१ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल १७९ वेळा बंद पडला. दादर स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवरील कल्याण दिशेला असलेला सरकता जिना ऑक्टोबरमधील २९ व ३० तारखेला १६० वेळा बंद पडला.

सीसीटीव्हीची मात्रा

सरकत्या जिन्यावरील आपत्कालीन बटणाचा गैरवापर होऊ नये, यासाठी जिन्याच्या भागात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दादर, सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण या स्थानकांत कॅमेरे बसवण्यात आले असून विनाकारण आपत्कालीन बटण दाबणाऱ्या किंवा जिन्यांच्या कार्यचलनात अडथळा आणणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. अन्य स्थानकांतील जिन्यांवरही येत्या दोन महिन्यांत अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांचा उपद्व्याप कुठे?

दादर, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वडाळा, ठाणे, विक्रोळी, आसनगाव, कर्जत, चेंबूर, माटुंगा, भायखळा, कळवा, मुलुंड, नाहूर, दिवा, अंबरनाथ, कसारा, शिवडी, शहाड ही स्थानके.