नव्या पादचारी पुलाचे काम वेगाने

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी नवा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या पुलाला सहा सरकते जिने बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या शिवाय परळमधील पुलाचा लष्कराकडून विस्तार केला जाणार आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने बसविले जात आहेत. याला मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडूनही हातभार लावण्यात येत आहे. सरकत्या जिन्यांमुळे वृद्ध, गरोदर स्त्रिया, लहान मुले, रुग्ण यांची पादचारी पूल चढताना दमछाक होत नाही. त्यामुळे रेल्वेच्या सरकत्या जिन्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. मध्य रेल्वेवरील स्थानकांवर सध्याच्या घडीला २२ सरकते जिने आहेत. या शिवाय आणखी ५२ जिने बसविण्याची योजना आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर ३२ सरकते जिने असून आणखी २५ जिने बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या शिवाय आणखी ३१ सरकते जिने बसविण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेवर असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बनणाऱ्या काही नवीन पादचारी पुलांना सरकते जिने बसविण्याची योजना आहे. एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्थानकाला जोडून नव्याने बनणाऱ्या पादचारी पुलाचाही यात समावेश आहे. या पुलाला सहा सरकते जिने बसविल्यास प्रत्येक फलाटावर प्रवाशांना पुलाच्या पायऱ्या चढण्याची गरजच भासणार नाही.

जुन्या पुलालाही सरकता जिना

पश्चिम तसेच मध्य रेल्वेकडून सध्याच्या परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकाला जोडूनच असलेल्या जुन्या पुलालाच समांतर पूर्व-पश्चिम असा आणखी एक नवीन पूल बांधला जाणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू असून पायाभरणीही करण्यात आली आहे. हा पूल जवळपास १२ मीटर रुंदीचा असेल.या पुलाला सहा सरकते जिने बसवण्यात येतील. परळ स्थानकाच्या दिशेने पुलाला दोन, एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या दिशेने पुलाला दोन सरकते जिने जोडले जातील. त्याचप्रमाणे सध्याच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकातील फलाटाची दादर दिशेने लांबी वाढविण्यात येणार आहे. त्याला नवीन पूल जोडण्यात येईल आणि त्याला आणखी दोन सरकते जिने जोडण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे परळ स्थानकातील पुलाच्या पूर्वेकडील दिशेला दोन सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.