मुंबई: करोना संसर्गाच्या  छायेत  विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात शनिवारी करण्यात आलेल्या करोना चाचचीत अंतरनियमांचा पुरता बोजवारा उडाला. नियोजनाचा अभाव, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचा फौजफाटयाची घुसखोरी, मंत्रालय, व विधानसभवन कर्मचाऱ्यांची वशीलेबाजी यामुळे या चाचणीच्या पहिल्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र दिसत होते.

विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सोमवार आणि मंगळवारी होणार असून या अधिवेशनावर करोनाचे सावट आहे. अधिवेशनाच्या तोंडावरच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, दुग्धविकासमंत्री सुनिल के दार यांना करोनाची लागण झाली आहे.

अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्वाची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शनिवारी विधानभवनाच्या आवारात करोना चाचणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी मंत्री,आमदार,अधिकारी, पोलीस, पत्रकार,सफाई कामगार आदींसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र  समन्वय आणि नियोजनाच्या अभावामुळे ही व्यवस्था कोडलमडून पडली होती.