बेस्टची सोळा मार्गावर तर एसटीबस थेट मंत्रालयापर्यंत

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन सेवा बंद झाल्या असतानाच मुंबईतील बेस्ट आणि एसटी या अत्यावश्यक सेवा

म्हणून जाहिर करण्यात आल्या. बेस्टने काही भागांत बेस्ट बसगाडय़ा चालवणे आवश्यक असतानाही दिवसभरात १,९०० बसगाडय़ा चालवल्या. या बसगाडय़ांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच अन्य प्रवाशांचाही समावेश होता. त्यामुळे बेस्ट बसला गर्दी झाल्याचे चित्र होते. दरम्यान, एसटी व बेस्टने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू केली आहे.

राज्य सरकारने एसटी व बेस्ट सेवेला अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केले आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच बेस्टची सेवा उपलब्ध असेल असे आहे. त्यानुसा बेस्ट १६ मार्गावर आपली सेवा देणार असल्याचे २२ मार्चला जाहिर केले. त्यानुसार सेवाही दिली जात आहे. मात्र त्याचा लाभ अन्य प्रवासीही घेत असल्याचे दिसते. २४ मार्चला ३ हजार १३६ पैकी १ हजार ९७१ बसगाडय़ा धावल्या. २ हजार ५1५ चालक आणि २ हजार ३९१ वाहक कामावर उपस्थित होते. मंगळवारी बोरीवली स्थानक पूर्व ते वडाळा आगार, गोराई आगार ते माहीम, शिवाजी नगर ते हुतात्मा चौक यासह अन्य मार्गावर बेस्टकडून सेवा दिली जात आहे.

मात्र यात बेस्ट बसला गर्दीच दिसते. अनेक जण विनाकारण घराबाहेर पडल्याचे दिसते. ओळखपत्र तपासून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित असतानाच मात्र सरसकट सर्वानाच प्रवेश दिला जातो. त्यमुळे अत्यावशक सेवेबरोबरच अन्य लोकही त्यातून प्रवास करतात. यात बेस्टकडून नियोजनाचा अभावच असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान शासनाने एसटी महामंडळ व बेस्ट प्रशासनाला अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार एसटीने मंत्रालयीन  कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण(सकाळी स ८:००, स ८:१५) येथून तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा व विरार (स ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी  बसेसची सोय केली आहे. तसेच बेस्ट मार्फत  बोरीवली स्टेशन ते मंत्रालय (स ८:००, स ८:३०),शासकीय वसाहत बांद्रा ते मंत्रालय(स ८:३०, स ९:००) पनवेल एसटी स्टँड ते मंत्रालय (स ७:३०, स ८:३०)ठाणे कॅडबरी जंक्शन ते मंत्रालय (स ८:००, स ८:३०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर ते मंत्रालय(स ८:३०, स ९:००) विक्रोळी आगार ते मंत्रालय(स. ८:३०, स ९:००), पि.के.खुराणा चौक वरळी ते मंत्रालय(स ८:४५,स ९:००) येथून बसेस सुटतील.