गेल्या वेळी आपण करोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासनाने दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

करोना विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संक्रमित झाली आहे. प्राणवायू उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह््यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ कृती दलाकडून समजून घ्यावे. प्राणवायूचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे करोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असे ठाकरे यांनी सांगितले.

रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना प्राणवायू सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा अशी सूचना राज्याच्या कृती दलाचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी के ली. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.

कठोर अंमलबजावणी करा, अतिरेक नको!

आपण कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी होईल, हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा करोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे ५८,९५२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ५८,९५२ रुग्ण आढळले, तर २७८ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रथमच सहा लाखांपेक्षा अधिक झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या काहीशी कमी झाली. राज्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकू ण संख्या ३५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. उपचाराधीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १ लाख १२ हजार रुग्ण हे पुणे जिल्ह््यात आहेत. मुंबई ८६,९३५, ठाणे जिल्हा ८४,०९८, नागपूर जिल्हा ६५,३६८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

अनेक राज्यांत दिवसभरात उच्चांक

उत्तर प्रदेश – २०५१०

दिल्ली – १७२८२

छत्तीसगड – १५१२१

कर्नाटक – ११२६५

मध्य प्रदेश – ९७२०

केरळ – ८७७८

गुजरात – ७४१०

राजस्थान – ६२००

पश्चिम बंगाल – ५८९२

योगी आदित्यनाथ यांना करोना

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी बुधवारी स्वत:च ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. आदित्यनाथ यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने ते मंगळवारपासूनच विलगीकरणात होते.

देशात दिवसभरात १,८४,३७२ बाधित

देशात करोनाचा वेगाने फैलाव होत असून, महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.