मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मुंबईतील जिना हाऊसचे अधिग्रहण करून त्यामध्ये प्रस्तावित साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे. या अगोदरही मंगलप्रभात लोढा यांनी ही मागणी केलेली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांना सादर केलेल्या निवेदनात मंगलप्रभात लोढा म्हणतात की, ”आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात भारत प्राचीन वैभव प्राप्त करत आहे आणि भारतीय नागरिकांनाही अभिमान वाटत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं असो किंवा नागरिकता संशोधन कायद्याद्वारे परदेशातील पीडित अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याचा मुद्दा असो, हा केवळ आपला दृढ निश्चिय आणि राष्ट्र हिताला सर्वोतोपरी मानन्याचा परिणाम आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छित आहे की, माझे विधानसभा क्षेत्र मलबार हिल (मुंबई) मधील भारताच्या फाळणीची आठवण करून देणारे जिना हाऊस उजाड अवस्थेत पडून आहे. स्वातंत्र्या अगोदर याच जिना हाऊसमध्ये बसून मोहम्मद अली जिना यांनी जवळपास एक दशकापर्यंत भारताचे तीन तुकडे करण्याचे षडयंत्र रचले व शेवटी यामध्ये ते यशस्वी झाले. जिना हाऊस भारताच्या फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ आहे.”

”भारत सरकारने २०१७ मध्ये ४९ वर्षे जुन्या शत्रु संपत्ती अधिनियमात संशोधन करून, हे सुनिश्चित केले आहे की, विभाजनावेळी पाकिस्तानमध्ये जाऊन स्थायिक झालेल्या लोकांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा किंवा नातलगांचा कोणताही हक्क नसून, त्यावर भारत सरकारचा हक्क आहे. सरकार आता अशा ९ हजार २८० संपत्तींचा लिलाव करणार आहे. तर, जिना हाऊसला साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कल्चर सेंटर घोषित करून सरकारची त्यामध्ये सांस्कृतिक कामकाज सुरू करण्याची योजना होती, ज्याबाबत जिना हाऊसच्या मुख्य दरवाज्यावर एक फलक देखील लावलेला आहे.”

मुंबईतील जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा; भाजप आमदार लोढा यांची मागणी

तसेच, आपल्याला विनंती आहे की राष्ट्रवादाच्या अस्मितेशी जुडलेल्या या भावनेला पाहून भारताच्या फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ जिना हाऊसचे अधिग्रहण करून त्यामध्ये प्रस्तावित साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करावी.” असंही मगंलप्रभात लोढा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.