News Flash

मुंबई महानगर क्षेत्रात १४ प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची उभारणी

 वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे महानगर प्रदेशात प्राणवायूची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे.

मुंबई : करोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून प्राणवायू तयार करणारे १४ प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उभारण्यात येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्रकल्प कार्यान्वित होतील, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे महानगर प्रदेशात प्राणवायूची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतील प्राणवायू शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात हवेतून प्राणवायू शोषून त्यातून शुद्ध प्राणवायू रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणत: एका प्रकल्पातून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) प्राणवायूची निर्मिती होऊन सुमारे २०० रुग्णांना त्याचा पुरवठा करता येऊ शकतो. म्हणजेच या १४ प्रकल्पातून दररोज २८ टन प्राणवायू उपलब्ध होणार असून सुमारे तीन हजार रुग्णांना लाभ होईल असे शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रातील प्राणवायूची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात तीन, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन प्राणवायू निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 2:08 am

Web Title: establishment of 14 oxygen generating projects in mumbai metropolitan area akp 94
Next Stories
1 भारत पेट्रोलियम रिफायनरी परिसरात  करोना उपचार केंद्रास केंद्राची मंजुरी
2 आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना अजूनही अग्निसुरक्षा कवच नाही!
3 प्राणवायू वाहतुकीसाठी राज्यातून  १६ हजार अतिरिक्त टँकर
Just Now!
X