राज्यात करोना प्रतिबंध लसीकरणाची पूर्वतयारी करण्यासाठी आरोग्य विभागाचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांचा समावेश असलेल्या लसीकरण कृती दलाची स्थापना केली आहे.

राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्याबाबत मुख्यमंत्र्यासमवेत मंगळवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणासाठी राज्यात कृती दलाची स्थापना करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या दलाची स्थापना केली आहे.

लस देण्याबाबत प्राधान्यक्रम ठरविणे, लशीच्या साठवण आणि वितरणासाठी शीतसाखळी व्यवस्थापन, लशीची किंमत यासह लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या नियोजनाची जबाबादारी या समितीवर सोपविलेली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि भारत बायोटेक, ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिटय़ूट यांसह चार लशींच्या चाचण्या प्रगत टप्प्यात आहेत. त्यामुळे यातील कोणतीही लस पुढील तीन महिन्यांत उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने पूर्वतयारी सध्या राज्यात सुरू आहे. आत्तापर्यंत लहान मुलांचे आपल्याकडे लसीकरण केले जाते. तेव्हा मोठय़ांना लसीकरण करण्यासाठी शीतसाखळीची सुविधा, लसीकरणाचा प्राधान्यक्रम, व्यवस्थापन, नियोजन आणि त्यानुसार प्रशिक्षण याबाबतची तयारी केली जाणार असल्याचे या समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

आठ जणांचा समावेश

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या या समितीमध्ये वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी यांच्यासह केईएम आणि जेजे रुग्णालयातील प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागाचे प्रमुख यांचा समावेश आहे.